CSK vs SRH : धोनी पुढच्या वर्षी आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणार का? कॅप्टन कूलने दिले उत्तर

शनिवारी रवींद्र जडेजाने फॉर्मवर लक्ष केंद्रित केल्यामुळे धोनीकडे कर्णधारपद सोपवले.

Will MS Dhoni play for Chennai Super Kings in IPL 2023
(फोटो सौजन्य – IPL)

महेंद्रसिंह धोनी आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून परतला आहे. चार वेळा आयपीएल विजेता कर्णधार एमएस धोनी रविवारी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध आयपीएल २०२२ च्या ४६ व्या सामन्यात नाणेफेकसाठी मैदानात उतरला होता. एमएस धोनीला नाणेफेक करताना पाहून त्याच्या चाहत्यांना आनंद झाला. टॉस प्रेझेंटर डॅनी मॉरिसनला कर्णधार धोनीचा आवाज ऐकणे अशक्य झाले होते कारण चाहते मोठ्याने आवाज करत होते. यादरम्यान एमएस धोनीने सांगितले की, तो पुढील वर्षी आयपीएल खेळणार की नाही.

शनिवारी रवींद्र जडेजाने फॉर्मवर लक्ष केंद्रित केल्यामुळे धोनीकडे कर्णधारपद सोपवले. आयपीएलच्या आधी, धोनीने रवींद्र जडेजाकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेतला होता. रविवारी जेव्हा धोनी नाणेफेकसाठी आला तेव्हा मॉरिसनने त्याला विचारले की तो भविष्यात यलो जर्सी म्हणजेच चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना दिसणार आहे का?

यावर धोनीने उत्तर देताना म्हटले की, “पुढच्या वर्षी म्हणजे २०२३ मध्येही तुम्ही मला पिवळ्या जर्सीत पहाल. पण ही जर्सी कोणती असेल, हे येणारा काळच सांगेल.” यामुळे धोनी पुढच्या वर्षीदेखील आयपीएलमध्ये चेन्नईच्या संघासोबत असणार हे स्पष्ट झाले आहे. पण तो कोणत्या भूमिकेत असेल हे मात्र त्याने सागितलेले नाही.

सामना संपल्यानंतर कर्णधार धोनीने संवाद साधला. त्याने फलंदाजांवर स्तुतीसुमने उधळली. ही चांगली धावसंख्या होती. जेव्हा तुम्ही अशी धावसंख्या बनवता तेव्हा गोलंदाजांसाठी ते थोडे सोपे होते, असे धोनी म्हणाला.

“मी इथे काही वेगळे केले नाही. जेव्हा तुम्ही एकाच ड्रेसिंग रूममध्ये असता तेव्हा तुम्ही त्याच गोष्टी बोलत असता. त्यामुळे कर्णधार बदलल्याने फारसा बदल होत नाही. लक्ष्य मोठे होते, त्यामुळे चांगल्या गोलंदाजीची गरज होती. आमच्या फिरकीपटूंनी पॉवरप्लेनंतर आवश्यक धावगती वाढवण्याचे उत्तम काम केले. ही विजयाची गुरुकिल्ली होती. कारण समोरच्या संघाने २०० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चांगली सुरुवात केली पण आमच्या फिरकीपटूंनी त्यांना रोखले,” असे धोनी म्हणाला.

सामन्यानंतर धोनीने रवींद्र जडेजाचे कर्णधारपद सोडल्याबाबतही भाष्य केले. “मला वाटतं जडेजाला गेल्या मोसमातच माहित होतं की तो यावर्षी कर्णधार होणार आहे. पहिल्या दोन सामन्यांमध्ये मी त्याचे कर्णधारपद पाहिले आणि नंतर त्याला त्यांच्या मर्जीने जबाबदारी पार पाडू दिली. मला वाटते की कर्णधारपदाचा त्याच्या तयारीवर आणि खेळावर परिणाम होत होता. त्याचा परिणाम त्याच्या फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणावरही दिसून आला, असे धोनी म्हणाला.

दरम्यान, महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जने सनरायझर्स हैदराबादचा १३ धावांनी पराभव करून हंगामातील तिसरा विजय नोंदवला. धोनी कर्णधार बनताच चेन्नईचे नशीब चमकले आणि संघाने हैदराबादवर सहज विजय मिळवला. हैदराबादविरुद्धच्या या सामन्यात चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवे यांच्या अर्धशतकांच्या जोरावर २०२ धावांची मजल मारली. यासमोर हैदराबादचा संपूर्ण संघ निर्धारित २० षटकांत केवळ १८९ धावाच करू शकला. चेन्नईकडून मुकेश चौधरीने सर्वाधिक चार विकेट घेतल्या.

मराठीतील सर्व आयपीएल २०२२ ( Ipl ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ipl 2022 csk vs srh will ms dhoni play for chennai super kings in ipl 2023 captain cool answer abn

Next Story
SRH vs CSK : उमरान मलिकने टाकला IPL 2022 मधील सर्वात वेगवान चेंडू; गायकवाडने ठोकला षटकार, पहा VIDEO
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी