शेवटच्या सहा चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी ३६ धावांचं आव्हान दिल्लीपुढे होतं. वेस्ट इंडिजचा रोवमेन पॉवेलनं शेवटच्या षटकाच्या पहिल्या तीन चेंडूंमध्ये तीन षटकार मारले आणि हे आव्हान पेलण्याची जिद्द दाखवली. पण तिसरा षटकार मारलेला चेंडू कमरेवर होता असं सांगत दिल्लीचा कर्णधार असणाऱ्या ऋषभ पंतसह दिल्लीच्या संघानं पंचांविरोधात अत्यंत वाईट प्रतिक्रिया देत मैदानातच गोंधळ घातला. त्यामुळे काही काळ खेळ थांबला, पुन्हा सुरू झाला पण या दिरंगाईत पॉवेलला गवसलेली लय हरवली आणि मकॉयला सूर गवसला व राजस्थाननं सामना जिंकला…

हा सारा हाय व्होल्टेज ड्रामा रंगला शुक्रवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर इंडियन प्रिमिअर लीग म्हणजेच आयपीएलच्या राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सच्या सामन्यात. शेवटच्या षटकात नाट्यमय घडामोडी पहायला मिळाल्या. २० व्या षटकामध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला ३६ धावांची गरज होती. म्हणजेच सहा चेंडूंमध्ये सहा षटकारांची आवश्यकता दिल्लीच्या संघाला होती. मात्र त्यांना सामना १५ धावांनी गमवावा लागला. विशेष म्हणजे यासाठी मैदानामधील कोणत्याही खेळाडूपेक्षा डगआऊटमध्ये बसलेला दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत जबाबदार असल्याचा दावा अनेकजण करत आहेत. पंतने गोंधळ घालून सामना थांबवल्याने पॉवेलला गवसलेली लय आणि गती त्याने गमावली. त्यामुळेच पहिल्या तीन चेंडूंवर १८ धावा कुटणारा पॉवेल सामन्याच्या शेवटच्या तीन चेंडूंमध्ये तीन धावा करुन बाद झाला.

झालं असं की, शेवटच्या षटकातील तिसऱ्या चेंडूंवर पॉवेलने षटकार लगावला. मात्र या षटकारानंतर मैदानात एक वाद झाला. हा चेंडू उंचीला फलंदाजाच्या कंबरेच्या वर असल्याने तो नो बॉल आहे की नाही यावरुन वाद झाला. सुरुवातीला हा नो बॉल असल्याचं वाटत होतं. मात्र मैदानावरील पंचांनी नो बॉल देण्यास नकार दिला. मात्र यामुळे नाराज झालेल्या ऋषभ पंतने मैदानातच विचित्र भूमिका घेतली. चेंडूची उंची पाहता तो नो बॉल असायला हवा होता असं पंतचं मत होतं. पंत एवढा नाराज होता की त्याने रागात दिल्ली कॅपिटल्सच्या दोन्ही फलंदाजांना सामना सोडून मैदानाबाहेर येण्यास सांगितलं.

दिल्लीचे प्रशिक्षक प्रवीण आम्रे यांनी मैदानात धाव घेतली. त्यांनी पंचांना चेंडू नो बॉल असल्याचं मैदानात येऊन सांगितलं. यंदाच्या आयपीएलमधील हा अशाप्रकारचा पहिलाच वाद ठरलाय. मात्र दिल्लीच्या संघातील अन्य प्रशिक्षकांनी पंतला शांत करत सामना सुरु ठेवण्यासाठी मध्यस्थी केली. मात्र या साऱ्या गोंधळात दिल्लीने आपल्याच फटकेबाजी करणाऱ्या पॉवेलची लय तोडल्याचा दावा अनेक चाहते करत आहेत.


पंत हा पंचांच्या निर्णयावर नाराज होता. त्याने पंचांच्या निर्णयावर सडकून टीका केली. मात्र पंतने घेतलेल्या भूमिकेमुळे पॉवेलला गवसलेली लय तो गमावून बसला आणि दिल्लीने सामनाही गमावला. दिल्लीने हा सामना १५ धावांनी गमावला.