scorecardresearch

इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट : ‘आयपीएल’वर पुन्हा करोनासंकट?

दिल्लीचे फिजिओ फरहार्ट यांचा अहवाल सकारात्मक; आजच्या सामन्याबाबत अनिश्चितता

दिल्लीचे फिजिओ फरहार्ट यांचा अहवाल सकारात्मक; आजच्या सामन्याबाबत अनिश्चितता

नवी दिल्ली : दिल्ली कॅपिटल्स संघाचे फिजिओ पॅट्रिक फरहार्ट यांचा करोना चाचणीचा अहवाल शुक्रवारी सकारात्मक आल्यामुळे इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटवर पुन्हा संकट निर्माण झाले आहे.

‘‘दिल्ली संघाचे फिजिओ फरहार्ट यांची करोना चाचणी सकारात्मक आली आहे. ते सध्या दिल्ली संघाच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली उपचार घेत आहेत,’’ अशी माहिती ‘आयपीएल’ संयोजकांकडून देण्यात आली. दोन महिने चालणाऱ्या ‘आयपीएल’च्या १५व्या हंगामात करोनाची लागण झालेले फरहार्ट हे पहिले व्यक्ती आहेत.

शनिवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर दिल्लीचा रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुविरुद्ध सामना रंगणार आहे. मात्र, फरहार्ट यांना करोनाची बाधा झाल्यामुळे या सामन्याबाबतही अनिश्चितता निर्माण झाली आहे. शुक्रवारी फरहार्ट यांच्या चाचणीचा अहवाल सकारात्मक येताच दिल्ली संघातील सर्व खेळाडूंना अलगीकरणात ठेवण्यात आले. तसेच त्यांची करोना चाचणीही करण्यात आली. या चाचण्यांचा अहवाल शनिवारी सकाळी येणे अपेक्षित असून त्यानंतरच दिल्ली-बंगळूरु सामन्याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल, असे समजते.

गतवर्षीही मे महिन्यात ‘आयपीएल’च्या जैव-सुरक्षा परिघात करोनाचा शिरकाव झाला होता. त्यामुळे भारतीय नियामक मंडळाला (बीसीसीआय) हंगाम स्थगित करणे भाग पडले होते. त्यानंतर उर्वरित सामने सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये संयुक्त अरब अमिराती येथे खेळवण्यात आले. यंदा करोनाचा धोका कमी करण्याच्या उद्देशाने ‘बीसीसीआय’ने महाराष्ट्रातील चार स्टेडियमवर ‘आयपीएल’ सामने खेळवले आहेत. मुंबईतील वानखेडे आणि ब्रेबॉर्न स्टेडियम, नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियम आणि गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या स्टेडियममध्ये हे सामने होत आहेत. मात्र, खबरदारी घेतल्यानंतरही आता पुन्हा ‘आयपीएल’च्या जैव-सुरक्षा परिघात करोनाचा शिरकाव झाल्याने ‘बीसीसीआय’ची चिंता वाढली आहे.

दीपक, रसिक स्पर्धेबाहेर

दीपक चहर आणि रसिक सलाम या अनुक्रमे चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्सच्या वेगवान गोलंदाजांना दुखापतींमुळे ‘आयपीएल’च्या उर्वरित हंगामाला मुकावे लागणार आहे. दीपकला पायाच्या दुखापतीमुळे सुरुवातीच्या सामन्यांत खेळता आले नाही. त्यावर उपचार घेताना राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पाठीला दुखापत झाल्याने दीपक संपूर्ण स्पर्धेत खेळणार नसल्याने ‘आयपीएल’च्या संयोजकांनी शुक्रवारी सांगितले. तसेच रसिकच्याही पाठीला दुखापत असून त्याच्या जागी कोलकाताने हर्षित राणाला संघात समाविष्ट केले आहे.

पॅट्रिक

फरहार्ट

मराठीतील सर्व आयपीएल २०२२ ( Ipl ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ipl 2022 delhi capitals physio patrick farhart tests positive for covid 19 zws

ताज्या बातम्या