मुंबई : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमध्ये गुरुवारी दिल्ली कॅपिटल्सपुढे कोलकाता नाइट रायडर्सचे आव्हान असून दोन्ही संघांचे विजयपथावर परतण्याचे लक्ष्य असेल.

वॉर्नर, पृथ्वीवर भिस्त

डेव्हिड वॉर्नर आणि पृथ्वी शॉ या दिल्लीच्या सलामीवीरांनी यंदा आपली चमक दाखवली आहे. राजस्थानविरुद्धच्या गेल्या सामन्यात वॉर्नरला २८ धावाच करता आल्या, मात्र त्यापूर्वीच्या सलग तीन सामन्यांत त्याने अर्धशतक झळकावले होते. तसेच पृथ्वीने यंदा दिल्लीकडून सर्वाधिक २५४ धावा केल्या आहेत. परंतु दिल्लीच्या मधल्या फळीतील फलंदाजांना धावांसाठी झगडावे लागत आहे. कर्णधार पंतला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही.

आघाडीच्या फळीची चिंता

कोलकाताला फलंदाजीत आघाडीच्या फळीची चिंता आहे. त्यांनी गेल्या सामन्यात सॅम बिलिंग्ज आणि सुनील नरिन यांना सलामीला संधी दिली. मात्र दोघेही अपयशी ठरले. तसेच कर्णधार श्रेयस अय्यरला (आठ सामन्यांत २४८ धावा) कामगिरीत सातत्य राखण्यात अपयश आले आहे. गोलंदाजीत उमेश यादव आणि टीम साऊदी यांनी प्रभावित केले आहे. अष्टपैलू आंद्रे रसेलमध्ये एकहाती सामना जिंकवण्याची क्षमता असून गेल्या सामन्यात त्याने चार गडी बाद करतानाच ४८ धावा केल्या.

*वेळ : सायं. ७.३० वा. *थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी, सिलेक्ट १ (संबंधित एचडी वाहिन्यांवर)