नवी मुंबई : कामगिरीत सातत्य राखण्यास अपयशी ठरलेले दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज हे संघ सोमवारी होणाऱ्या ‘आयपीएल’च्या लढतीत आमनेसामने येणार आहेत. दोन्ही संघांचा विजय मिळवत बाद फेरीत पोहोचण्याच्या आपल्या आशा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न असेल.

दिल्ली आणि पंजाब या दोन्ही संघांना यंदाच्या हंगामात सलग दोन सामने जिंकता आलेले नाहीत आणि उर्वरित सामन्यांत एक पराभवही निर्णायक ठरू शकतो. दिल्लीने गेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सला, तर पंजाबने रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुला पराभूत केले होते.

दिल्लीचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने सातत्यपूर्ण कामगिरी केली असून गेल्या सामन्यात मिचेल मार्शला लय सापडणे ही दिल्लीसाठी आनंदाची बाब आहे. कर्णधार ऋषभ पंत आणि रोव्हमन पॉवेलकडे मोठे फटके मारण्याची क्षमता आहे. दिल्लीच्या गोलंदाजीची धुरा ही आनरिख नॉर्किए, शार्दूल ठाकूर आणि कुलदीप यादववर असेल. दुसरीकडे, पंजाबसाठी जॉनी बेअरस्टो, लियाम लिव्हिंगस्टोन, शिखर धवन आणि भानुका राजपक्षे चांगली कामगिरी करत आहेत. गोलंदाजीत कॅगिसो रबाडा, अर्शदीप सिंग आणि राहुल चहरकडून मोठय़ा अपेक्षा आहेत.

* वेळ : सायं. ७.३० वाजता

* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी, सिलेक्ट १ (संबंधित एचडी वाहिन्यांवर)