यंदाचे आयपीएल पर्व शेवटच्या टप्प्यात आहे. या हंगामातील अवघे काही सामने शिल्लक राहिले असून लवकरच प्लेऑफचे चार सामने खेळवले जाणार आहेत. त्यापूर्वी बीसीसीआयने अंतिम सामन्याची वेळ बदलली आहे. यावेळी अंतिम सामना सायंकाळी ७.३० ऐवजी ८.०० वाजता खेळवला जाणार आहे. यावेळी समारोप सोहळा आयोजित केला जाणार असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, या समारोप सोहळ्याला बॉलिवूडमधील दिग्गज कलाकार हजेरी लावणार असून मनोरंजन करणार आहेत.

हेही वाचा >> सुवर्णपदकाच्या कमाईनंतर निखत झरीनवर कौतुकाचा वर्षाव; आनंद महिंद्रा यांनीही खास ट्विट करत केले अभिनंदन, म्हणाले…

यावेळी बीसीसीआय तसेच आयपीएलने समारोप सोहळा आयोजित करण्याचे ठरवले आहे. हा सोहळा अंतिम सामना सुरु होण्याआधी आयोजित केला जाणार आहे. क्रिकबझने दिलेल्या माहितीनुसार हा कार्यक्रम एकूण ५० मिनिटांचा असून या कार्यक्रमाला २९ मे रोजी सायंकाळी ६.३० वाजता सुरुवात होणार आहे. या कार्यक्रमात बॉलिवूडमधील अनेक कलाकार हजेरी लावणार असून ते मनोरंजनपर कार्यक्रम सादर करतील. म्हणजेच आयपीएलचा अंतिम सामना सुरु होण्याआधी प्रेक्षकांना ग्लॅमरचा तडका अनुभवायला मिळणार आहे. दरम्यान या कार्यक्रमात कोणकोणते कलाकार येतील याबाबत निश्चित माहिती मिळालेली नाही.

हेही वाचा >> जोराचा फटका मारताना पांड्याच्या हातातून निसटली बॅट, पंच बालंबाल बचावला, पाहा नेमकं काय घडलं?

याआधी आयपीएलच्या प्रत्येक हंगामात उद्घाटन आणि समारोप सोहळ्याला बॉलिवूडमधील दिग्गज कलाकार प्रेक्षकांचे मनोरंजन करत असत. मात्र २०१९ साली पुलवामा हल्ल्यामुळे हे कार्यक्रम घेण्यात आले नव्हते. तसेच २०२० आणि २०२१ च्या हंगामात करोना महामारीमुळे हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले नव्हते. मात्र यावेळी समारोपाचा मोठा कार्यक्रम होणार असल्याचे म्हटले जात आहे.

हेही वाचा >> हेल्मेट फेकले, बॅटही आपटली; बाद होताच मॅथ्यू वेड झाला लालबूंद, पाहा व्हिडीओ

दरम्यान, आयपीएलच्या शेवटच्या टप्प्यात प्लेऑफमधील चार सामने कोलकाता आणि अहमदाबाद येथील स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत. कोलकाता येथील इडन गार्डन या स्टेडियमवर क्वॉलिफायर १ आणि एलिमिनेटर सामना खेळवला जाईल. तर क्वॉलिफायर २ आणि अंतमि सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल.

हेही वाचा >> अफलातून ग्लेन मॅक्सवेल! एका हाताने टिपला भन्नाट झेल; शुभमन गिल अवघी १ धाव करुन तंबुत परतला

क्वालिफायर-१ : २४ मे २०२२ संध्याकाळी ७.३० वाजता (कोलकाता, ईडन गार्डन्स)
एलिमिनेटर: २५ मे २०२२ संध्याकाळी ७.३० वाजता (कोलकाता, ईडन गार्डन्स)
क्वालिफायर-२: २७ मे २०२२ संध्याकाळी ७.३० वाजता (अहमदाबाद, नरेंद्र मोदी स्टेडियम)
अंतिम: २९ मे २०२२, रात्री ८.०० वाजता (अहमदाबाद, नरेंद्र मोदी स्टेडियम)