scorecardresearch

IPL 2022 GT vs LSG : राहुल तेवतीयाने तारलं, पहिल्याच सामन्यात लखनऊला चारली धूळ, गुजरातचा ५ गडी राखून विजय

गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात आयपीएलचा चौथा सामना चांगलाच रंगला.

GUJRAT TITANS WON
गुजरात टायटन्सचा विजय झाला. (फोटो ट्विटरवरुन साभार)

गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात आयपीएलचा चौथा सामना चांगलाच रंगला. दोन्ही संघाचा हा पहिलाच सामना असल्यामुळे दोघांमध्ये रोमहर्षक लढत झाली. आजच्या या अटीतटीच्या लढतीत गुजरातचा पाच गडी राखून विजय झाला. या विजयासाठी राहुल तेवतीयाने चांगलीच मेहनत घेऊन मैदानावर टिकून राहत गुजरातला विजयापर्यंत नेलं. त्याने २४ चेंडूत ४० धावा केल्या.

लखनऊने दिलेल्या १५९ धावांचे लक्ष गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या गुजरातच्या शुभमन गिलने घोर निराशा केली. तो पहिल्याच षटकात शून्यावर बाद झाला. त्यानंतर संघ १३ धावांवर असताना विजय शंकरच्या रुपाने गुजरातला दुसरा धक्का बसला. मात्र त्यानंतर हार्दिक पांड्या आणि मॅथ्यू वेडने संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. या जोडीने अर्धशतकी भागिदारी केल्यामुळे संघ चांगल्या प्रकारे सावरला. मात्र धावफलक ७२ वर असताना हार्दिक पांड्या ३३ धावांवर बाद झाला. त्यानंतर मात्र राहुल तेवतीयाने बाृहारदार खेळ करत विजय खेचून आणला. डेव्हिड मिलर आणि राहुल तेवतीया या जोडीने पन्नास धावांची भागिदारी केली. चौकार तसेच षटकार लगावत राहुल तेवतीयाने लखनऊच्या गोलंदाजांना सळो की पळो करुन सोडले आणि नाबाद राहत पाच गडी राखून संघाला विजय मिळवून दिला.

यापूर्वी गुजरातने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. लखनऊ संघाकडून केएल राहुल आणि क्विटंन डी कॉक सालमीला मैदानात उतरले. मात्र पहिल्याच चेंडूमध्ये लखनऊचा कर्णधार झेलबाद झाला. कर्णधारच शून्यावर बाद झाल्यामुळे लखनऊ संघावर दबाव वाढला. त्यानंतर दुसऱ्याच षटकात मोहम्मद शमीने त्रिफळा उडवत क्विंटन डी कॉकचा बळी घेतला. त्यानंतर मैदानात उतरलेला एविन लुईसही चांगला खेळ करु शकला नाही. संघ २० धावांवर असताना लुईस शमीने टाकलेल्या चेंडूवर लुईस अवघ्या दहा धावांवर झेलबाद झाला. त्यानंतर लगेच मनिष पांडे शमीने टाकलेल्या चेंडूवर त्रिफळा उडाल्यामुळे सहा धावंवर बाद झाला. पांडे तंबूत परतल्यानंतर लखनऊची चार गडी बाद २९ धावा अशी दयनीय स्थिती झाली.

पुढे दीपक हुडा आणि अयुष बदोनी यांनी चांगला खेळ केला. दीपकने दाबवाची पर्वान करता मोठे फटके मारले. त्याने ४१ चेंडूंमध्ये सहा चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ५५ धावा केल्या. मात्र रशिद खानेने टाकलेल्या चेंडूवर तो पायचित झाला. तर दुसरीकडे बावीस वर्षीय अयुष बदोनीने धमाकेदार फलंदाजी करत सर्वांनाच आश्चर्यचकित केलं. त्याने ४१ चेंडूंमध्ये तीन षटकार आणि चार चौकार यांच्या मदतीने ५४ धावा केल्या. अरॉनच्या चेंडूवर जोराचा फटका मारताना चेंडू हवेत गेल्यामुळे तो हार्दिक पांड्याच्या हातात विसावल्यामुळे बदोनी ५४ धावांवर बाद झाला. पुढे सातव्या विकेटसाठी कृणाल पांड्याने चांगली फलंदाजी करत तेरा चेंडूमध्ये २१ धावा केल्या. हुडा, बदोनी आणि कृणाल पांड्या यांच्या जोरावर लखनऊने गुजरातसमोर १५९ धावांचे आव्हान उभे केले.

तर गोलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर गुजरातच्या गोलंदाजांनी लखनऊच्या फलंदाजांना चांगलेच जेरीस आणले. पहिल्याच चेंडूवर केएल राहुल बाद झाला. मोहम्मद शमीने टाकलेल्या पहिल्याच चेंडूवर राहुल बाद झाला. त्यानंतर तिसरे षटक सुरु असतानाच शमीने डी कॉकला बाद केले. लखनऊच्या वीस धावा असताना नंतर अरॉनने लुईसला बाद करत गुजरातला तिसरा बळी मिळवून दिला. त्यानंतर शमीने मनिषला सहा धावांवर बाद करुन चौथा बळी घेतला. शमिने तीन अरॉनने दोन तर रिशद खानने एक बळी घेतला.

मराठीतील सर्व आयपीएल २०२२ ( Ipl ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ipl 2022 gt vs lsg gujarat titans won by five wickets against lucknow super giants prd

ताज्या बातम्या