नवी मुंबई : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमध्ये आपल्या पदार्पणातच सलग तीन विजय मिळवत आत्मविश्वास दुणावलेल्या गुजरात टायटन्सचा सोमवारी सनरायजर्स हैदराबादशी सामना होईल.

नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर होणाऱ्या या लढतीत गुजरातचे विजयी कामगिरीत सातत्य ठेवण्याचे लक्ष्य असेल. दुसरीकडे,  हैदराबादचा संघ गुजरातचा विजयरथ रोखण्याचा प्रयत्न करेल.

सलामीवीर गिलकडून अपेक्षा

गुजरातचा सलामीवीर शुभमन गिल दमदार कामगिरी करत असून पंजाबविरुद्ध त्याने ‘आयपीएल’ कारकीर्दीतील सर्वोत्तम ९६ धावांची खेळी केली. गिलला मॅथ्यू वेड आणि साई सुदर्शन यांच्याकडून सहकार्याची अपेक्षा असेल. पंजाबविरुद्ध डावखुऱ्या राहुल तेवतियाने दोन षटकार मारत सामना जिंकवून दिला होता. त्याच्यासह कर्णधार हार्दिक पंडय़ा विजयवीराची भूमिका बजावतील. गोलंदाजीची लॉकी फग्र्युसन आणि मोहम्मद शमी या वेगवान जोडीसह फिरकीपटू रशीद खानवर भिस्त आहे.

विल्यम्सनच्या नेतृत्वगुणाचा कस

पहिल्या दोन सामन्यांतील अपयशानंतर हैदराबादचा कर्णधार विल्यम्सनने चेन्नईविरुद्ध संघाला चांगली सुरुवात दिली. त्याने आणि युवा अभिषेक शर्माने (७५) मोठी भागीदारी रचली. या दोघांकडून संघाला सातत्यपूर्ण कामगिरीची अपेक्षा आहे. कर्णधार म्हणूनही विल्यम्सन महत्त्वाची भूमिका बजावेल. फलंदाजीत राहुल त्रिपाठी, निकोलस पूरन आणि एडिन मार्करम यांनी योगदान देणे गरजेचे आहे. गोलंदाजीची मदार वॉिशग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार आणि टी. नटराजन यांच्या खांद्यावर असेल.

वेळ : सायं. ७.३० वा. ’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी (संबंधित एचडी वाहिन्यांवर)