पुणे : गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स हे इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटच्या गुणतालिकेतील अव्वल दोन संघ मंगळवारी आमनेसामने येणार आहेत. या दोन्ही संघांना पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या स्टेडियमवर होणारा हा सामना जिंकून बाद फेरीतील स्थान निश्चित करण्याची संधी मिळणार आहे.

गुजरात आणि लखनऊ या संघांनी यंदा ‘आयपीएल’मध्ये पदार्पण करताना दमदार कामगिरी केली आहे. या दोन्ही संघांना आतापर्यंत ११ पैकी आठ सामने जिंकण्यात यश आले आहे. मात्र, सरस निव्वळ धावगतीमुळे लखनऊचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. 

राहुल, डीकॉकवर भिस्त

लखनऊच्या संघाला यंदा सांघिक कामगिरी करण्यात यश आले आहे. परंतु त्यांच्या फलंदाजीची भिस्त प्रामुख्याने कर्णधार केएल राहुल आणि क्विंटन डीकॉक या सलामीवीरांच्या खांद्यावर आहे. राहुल यंदा सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने ४५१ धावा केल्या आहेत. गोलंदाजीत आवेश खान, जेसन होल्डर, मोहसिन खान आणि दुश्मंता चमीरा यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.  

हार्दिक, रशीदवर नजर

गुजरातच्या आघाडीच्या फळीतील फलंदाजांना कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही. मुंबईविरुद्धच्या गेल्या सामन्यात शुभमन गिल आणि वृद्धिमान साहा या सलामीवीरांनी अर्धशतके झळकावली. त्यांचा आता लखनऊविरुद्ध चांगली कामगिरी सुरू ठेवण्याचा प्रयत्न असेल. कर्णधार हार्दिक पंडय़ाला गेल्या चार सामन्यांत ३० धावांचा टप्पा पार करता आलेला नाही. त्याच्या कामगिरीत सुधारणा गरजेची आहे. मात्र, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया आणि रशीद खान हे विजयवीराची भूमिका सक्षमपणे बजावत आहेत. फलंदाजीप्रमाणेच गोलंदाजीतही फिरकीपटू रशीदच्या कामगिरीवर सर्वाची नजर असेल. त्याला मोहम्मद शमी, लॉकी फग्र्युसन आणि अल्झारी जोसेफ या वेगवान त्रिकुटाने चांगली साथ देणे आवश्यक आहे.   

* वेळ : सायं. ७.३० वा.

* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस १, २, १ हिंदी, सिलेक्ट १ (संबंधित एचडी वाहिन्यांवर)