आज गुजरात टायटन्स-सनरायजर्स हैदराबाद आमनेसामने
मुंबई : इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) बुधवारी सनरायजर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स हे गुणतालिकेतील अव्वल दोन संघ आमनेसामने येणार आहेत. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात दोन्ही संघांच्या वेगवान गोलंदाजांतील द्वंद्वाकडे सर्वाचे लक्ष असेल.
या दोन्ही संघांच्या यशात वेगवान गोलंदाजांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. गुजरातकडे लॉकी फग्र्युसन, तर हैदराबादकडे उमरान मलिकसारखा तेजतर्रार मारा करणारा गोलंदाज आहे. या दोघांमध्येही सातत्याने ताशी १५० किमीच्या वेगाने चेंडू टाकण्याची क्षमता आहे. त्यामुळे या सामन्यात दोन्ही संघांतील फलंदाजांना धावा करण्यासाठी झगडावे लागू शकेल.
मलिक, यान्सनकडून अपेक्षा
हैदराबादने मागील पाचही सामने जिंकले असून गेल्या सामन्यात त्यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुला नऊ गडी आणि ७२ चेंडू राखून धूळ चारली होती. या सामन्यात हैदराबादच्या गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यामुळे बंगळूरुचा डाव अवघ्या ६८ धावांत आटोपला. हैदराबादच्या गोलंदाजांनी यंदा उत्कृष्ट कामगिरी केली असून तेजतर्रार मारा करणाऱ्या मलिकने आतापर्यंत सात सामन्यांत १० बळी घेतले आहे. त्याला टी. नटराजन (१५ बळी), भुवनेश्वर कुमार (नऊ बळी) आणि मार्को यान्सेन (सहा बळी) या त्रिकुटाची उत्तम साथ लाभते आहे.
फग्र्युसन, शमीवर भिस्त
गुजरातच्या वेगवान गोलंदाजांकडेही प्रतिस्पर्ध्याना अडचणीत टाकण्याची क्षमता आहे. त्यांच्या गोलंदाजीची भिस्त प्रामुख्याने फग्र्युसन (नऊ बळी) आणि मोहम्मद शमी (१० बळी) यांच्यावर आहे. लेग-स्पिनर रशीद खानची (आठ बळी) चांगली साथ मिळते आहे. फलंदाजीत हार्दिक पंडय़ाने यंदा सहा सामन्यांत ७३.७५च्या सरासरीने २९५ धावा केल्या आहेत. मात्र, त्याच्या तंदुरुस्तीबाबत गुजरातला चिंता आहे. फलंदाजीत डेव्हिड मिलर आणि शुभमन गिल यांनीही सातत्याने योगदान देणे गरजेचे आहे. ’ वेळ : सायं. ७.३० वा. ’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी (संबंधित एचडी वाहिन्यांवर)