आयपीएल 2022 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत आक्रमक पद्धतीने फलंदाजी करताना दिसत आहे. त्याने अनेक सामन्यांमध्ये झटपट सुरुवात केली परंतु तो त्याच्या डावाचे मोठ्या धावसंख्येमध्ये रूपांतर करू शकला नाही. पंतने या हंगामात नऊ सामन्यांमध्ये 33.42 च्या सरासरीने २३४ धावा केल्या आहेत. त्याच वेळी, त्याचा स्ट्राइक रेट १४९.०४ आहे तर त्याची सर्वोच्च धावसंख्या ४४ राहिली आहे.

आज दिल्ली कॅपिटल्सचा सामना सनरायझर्स हैदराबादशी होत असून हा सामना जिंकणे दिल्लीसाठी खूप महत्त्वाचे आहे. हैदराबादविरुद्ध ऋषभ पंतची फलंदाजी कशी राहिली हे या सामन्यापूर्वी जाणून घेऊया.

DC vs SRH : दिल्ली आणि हैदराबाद आज येणार आमनेसामने; जाणून घ्या दोन्ही संघातील प्लेइंग इलेव्हन

सनरायझर्स हैदराबादविरुद्ध पंतची खेळी खूपच प्रभावी आहेत आणि त्याने १४ सामन्यात १४७.९३ च्या स्ट्राइक रेटने ४६६ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने शतकही झळकावले आहे. त्याचबरोबर या संघाविरुद्ध त्याची फलंदाजीची सरासरी ४७ च्या आसपास आहे.

SRH च्या प्रमुख गोलंदाजांविरुद्ध ऋषभ पंतची कामगिरी –

सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने चालू हंगामात अतिशय भेदक गोलंदाजी करत फलंदाजांना जास्त धावा करू दिल्या नाहीत. मात्र, पंतने भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर २३९.३९ च्या स्ट्राइक रेटने ३३ चेंडूत ७९ धावा केल्या आणि तो फक्त एकदाच बाद झाला आहे.

टी नटराजनने या हंगामात चांगली गोलंदाजी केली आहे आणि तो त्याच्या संघासाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. मधल्या षटकांमध्ये ऋषभ पंतचा नटराजनशी सामना होऊ शकतो. हैदराबादच्या या गोलंदाजाविरुद्ध धावा करण्यात पंतला फारसे यश मिळालेले नाही पण त्याने एकदाही विकेट गमावलेली नाही. नटराजनच्या गोलंदाजीवर पंतने १८ चेंडूत २१ धावा केल्या आहेत.

ऋषभ पंत आणि उमरान मलिक अद्याप एकमेकांसमोर आलेले नाहीत, मात्र आज हा सामना पाहायला मिळू शकतो. उमराणच्या वेगवान गोलंदाजीसमोर पंत कसा खेळणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.