पीटीआय, नवी दिल्ली : सनरायजर्स हैदराबाद संघाचा सलग चौथ्या विजयाचा निर्धार असून इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमध्ये रविवारी त्यांच्यापुढे पंजाब किंग्जचे आव्हान असेल. केन विल्यम्सनच्या नेतृत्वाखालील हैदराबादला यंदा हंगामाच्या पहिल्या दोन्ही सामन्यांत पराभव पत्करावा लागला होता. मात्र, त्यानंतर त्यांनी दमदार पुनरागमन करताना चेन्नई सुपर किंग्ज, गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यावर मात करताना विजयाची हॅट्ट्रिक साजरी केली. आता पंजाबविरुद्ध विजयरथ कायम राखण्याचा हैदराबादचा प्रयत्न असेल.

दुसरीकडे, मयांक अगरवालच्या नेतृत्वाखालील पंजाबला यंदा सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही. त्यांना तीन सामने जिंकण्यात यश आले असले, तरी दोन सामन्यांत त्यांचा पराभव झाला आहे. मात्र, गेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सवर मात केल्याने त्यांचा आत्मविश्वास उंचावलेला आहे.

  • त्रिपाठी, मार्करमकडून अपेक्षा

हैदराबादचा फलंदाज राहुल त्रिपाठीने कोलकाताविरुद्ध गेल्या सामन्यात आक्रमक शैलीत खेळताना ३७ चेंडूंत ७१ धावा फटकावल्या. त्याला एडीन मार्करमची (३६ चेंडूंत नाबाद ६८ धावा) उत्तम साथ लाभली. त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. फलंदाजीत कर्णधार विल्यम्सन आणि अभिषेक शर्मा, तर गोलंदाजीत टी. नटराजन, भुवनेश्वर कुमार आणि मार्को यॅन्सन हेसुद्धा हैदराबादसाठी महत्त्वाची भूमिका बजावतील.

  • धवन, रबाडावर जबाबदारी

यंदा पंजाबकडून फलंदाजीत जितेश शर्मा आणि शाहरूख खान, तर गोलंदाजीत वरुण अरोरा या युवकांनी सर्वाना प्रभावित केले आहे. परंतु सलामीवीर शिखर धवन, कर्णधार मयांक, जॉनी बेअरस्टो, कॅगिसो रबाडा यांसारख्या पंजाबच्या अनुभवी खेळाडूंनी अधिक जबाबदारीने खेळणे गरजेचे आहे. मयांक आणि धवन यांनी गेल्या सामन्यात अर्धशतके झळकावली. त्यामुळे त्यांना सूर गवसला आहे. तसेच लियाम लिव्हिंगस्टोन, राहुल चहर आणि अर्शदीप सिंग यांचेही योगदान पंजाबच्या यशासाठी महत्त्वाचे असेल.