पीटीआय, नवी मुंबई : महेंद्रसिंह धोनी कारकीर्दीच्या अखेरच्या टप्प्यावर असला, तरी त्याच्यातील धावांची भूक कायम आहे. तो अजूनही जगातील सर्वोत्तम विजयवीर आहे, अशा शब्दांत इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमधील चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार रवींद्र जडेजाने आपल्या अनुभवी सहकाऱ्याचे कौतुक केले.

चेन्नईने गुरुवारी झालेल्या ‘आयपीएल’च्या सामन्यात मुंबई इंडियन्सवर तीन गडी राखून मात केली. चेन्नईचा हा सात सामन्यांत दुसरा विजय ठरला. त्यामुळे चेन्नईने आपले यंदाच्या स्पर्धेतील आव्हान कायम राखले आहे. या सामन्यात चेन्नईला अखेरच्या चार चेंडूंत विजयासाठी १६ धावांची आवश्यकता होती. धोनीने जयदेव उनाडकटच्या गोलंदाजीवर दोन चौकार, एक षटकार आणि एका दुहेरी धावेच्या साहाय्याने या धावा करत चेन्नईला अशक्यप्राय वाटणारा विजय मिळवून दिला. त्याने केवळ १३ चेंडूंत नाबाद २८ धावांची खेळी केली. त्यामुळे धोनीने आपले महत्त्व पुन्हा सिद्ध केल्याचे जडेजा म्हणाला.

‘‘धोनीतील धावांची आणि संघाला विजय मिळवून देण्याची भूक अजूनही कायम आहे. या सामन्यात अखेरच्या षटकांमध्ये दोन्ही संघांवर दडपण होते. मात्र, धोनी मैदानात असल्याने आम्हाला फारशी चिंता वाटत नव्हती. त्याने याआधी भारताला आणि ‘आयपीएल’मध्ये चेन्नईला अनेक सामने जिंकवून दिले आहेत. तो अखेरच्या षटकापर्यंत खेळपट्टीवर असल्यास आम्हाला सामना जिंकण्याची खात्री होती आणि तसेच झाले. आपण अजूनही सर्वोत्तम विजयवीर असल्याचे धोनीने पुन्हा एकदा दाखवून दिले,’’ असे जडेजाने मुंबईविरुद्धच्या सामन्यानंतर सांगितले.

रोहित, इशानला जयवर्धनेचा पाठिंबा

पाच वेळा ‘आयपीएल’ विजेत्या मुंबई इंडियन्सला यंदाच्या हंगामात सलग सात सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे. तसेच कर्णधार रोहित शर्मा आणि इशान किशन या मुंबईच्या सलामीवीरांनीही निराशा केली आहे. मात्र, मुंबईचा प्रशिक्षक महेला जयवर्धनेने या दोघांना पाठिंबा दर्शवला आहे. ‘‘इशानला पहिल्या दोन-तीन सामन्यांनंतर कामगिरीत सातत्य राखता आले नाही. रोहितला १५-२० धावांपर्यंत पोहोचण्यात यश येत आहे. मात्र, तो मोठी खेळी करू शकलेला नाही. परंतु मला या दोघांबाबत फारशी चिंता वाटत नाही. ते सरावादरम्यान चांगली फलंदाजी करत आहेत. त्यांचा आत्मविश्वासही खालावलेला नाही. त्यामुळे ते लवकरच दमदार कामगिरी करतील याची मला खात्री आहे,’’ असे प्रशिक्षक जयवर्धनेने नमूद केले.

मोक्याच्या क्षणी खेळ उंचावणे गरजेचे -सचिन

ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये एखादी चूकही खूप महागात पडू शकते. त्यामुळे मुंबई इंडियन्सने चूका सुधारून मोक्याच्या क्षणी खेळ उंचावणे गरजेचे आहे, असे मत या संघाचा प्रेरक सचिन तेंडुलकरने व्यक्त केले. ‘‘ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये प्रत्येक चेंडू खूप महत्त्वाचा असतो. तुम्ही एखादी चूक केली, तरी तुम्हाला सामना अवघ्या दोन-तीन धावांनी गमवावा लागतो. त्यामुळे मोक्याच्या क्षणी खेळ उंचावणे गरजेचे असते आणि मुंबईला यातच यंदा अपयश आले आहे. आम्ही या चूकांमधून धडा घेणे आवश्यक आहे,’’ असे सचिन म्हणाला.