पीटीआय, मुंबई : यंदाच्या ‘आयपीएल’ हंगामात आठपैकी सहा सामने गमावल्यामुळे रवींद्र जडेजाने शनिवारी चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधारपद सोडले. त्यामुळे इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमधील उर्वरित सामन्यांसाठी अनुभवी महेंद्रसिंह धोनीकडे पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

अपयशी वैयक्तिक आणि सांघिक कामगिरीची नैतिक जबाबदारी जडेजाने स्वीकारली. कर्णधारपदाच्या जबाबदारीमुळे जडेजाच्या खेळावर प्रचंड दडपण आले आहे. त्याने आठ सामन्यांत फलंदाजीत फक्त ११२ धावा आणि गोलंदाजीत पाच बळी मिळवले आहेत. रविवारी होणाऱ्या सनरायजर्स हैदराबाद संघाविरुद्धच्या सामन्याच्या पूर्वसंध्येला जडेजाने आपला निर्णय स्पष्ट केला. ‘‘स्वत:च्या खेळाकडे अधिक लक्ष देता यावा, याकरिता जडेजाने कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर धोनीला उर्वरित हंगामासाठी नेतृत्व स्वीकारण्याची त्याने विनंती केली होती. धोनीने ती मान्य केली आहे,’’ असे चेन्नई सुपर किंग्जकडून सांगण्यात आले आहे.

‘डॅड्स आर्मी’ म्हणून बिरुद मिरवणाऱ्या चेन्नईने गतवर्षी चौथे ‘आयपीएल’ जेतेपद पटकावले होते. परंतु दोन विश्वचषक जिंकून देणारा भारताचा माजी कर्णधार धोनीने कर्णधारपदाची जबाबदारी संघातील सर्वात अनुभवी अष्टपैलू खेळाडू जडेजाकडे सोपवली होती. चेन्नईच्या मोहिमेला प्रारंभ होण्याआधी जडेजाच्या कर्णधारपदाची घोषणा चेन्नईकडून करण्यात आली होती. आतापर्यंतच्या सामन्यांमध्येही जडेजापेक्षा धोनीच मैदानी व्यूहरचना आखताना दिसत होता. सध्या ‘आयपीएल’ गुणतालिकेत चेन्नईचा संघ नवव्या स्थानावर असून, बाद फेरी गाठण्याच्या त्यांच्या आशा जर-तरच्या समीकरणांवर अवलंबून आहेत.

जडेजाची कामगिरी

  • सांघिक : ८ सामने, २ विजय, ६ पराभव ’ वैयक्तिक : ११२ धावा, ५ बळी