scorecardresearch

IPL 2022 इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट : मुंबईची विजयाची पाटी कोरीच!; बटलरच्या शतकामुळे राजस्थानची २३ धावांनी बाजी

अनुभवी सलामीवीर जोस बटलरच्या (६८ चेंडूंत १०० धावा) दिमाखदार शतकाच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने शनिवारी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमधील सामन्यात मुंबई इंडियन्सला २३ धावांनी नमवले.

पीटीआय, नवी मुंबई : अनुभवी सलामीवीर जोस बटलरच्या (६८ चेंडूंत १०० धावा) दिमाखदार शतकाच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने शनिवारी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमधील सामन्यात मुंबई इंडियन्सला २३ धावांनी नमवले. त्यामुळे दोन सामन्यांनंतरही मुंबईची विजयाची पाटी कोरीच राहिली.

डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या सामन्यात राजस्थानने दिलेल्या १९४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईला २० षटकांत ८ बाद १७० धावांचीच मजल मारता आली. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला (१०) प्रसिध कृष्णाने डावाच्या दुसऱ्याच षटकात माघारी पाठवले, तर अनमोलप्रीत सिंग (५) पुन्हा अपयशी ठरला. यानंतर सलामीवीर इशान किशन (४३ चेंडूंत ५४) आणि युवा तिलक वर्मा (३३ चेंडूंत ६१) या डावखुऱ्या फलंदाजांनी अप्रतिम खेळी केल्या. त्यांनी तिसऱ्या गडय़ासाठी ८१ धावांची भागीदारी रचत मुंबईच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या. मात्र, हे दोघे दोन षटकांच्या अंतराने बाद झाल्यामुळे मुंबईचा संघ अडचणीत सापडला. मग किरॉन पोलार्डचा (२४ चेंडूंत २२) अपवाद वगळता एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता न आल्याने मुंबईला पराभव पत्करावा लागला.

तत्पूर्वी, मुंबईने नाणेफेक जिंकून फलंदाजीचे आमंत्रण दिल्यावर राजस्थानने ८ बाद १९३ अशी धावसंख्या उभारली. यशस्वी जैस्वाल (१) आणि देवदत्त पडिक्कल (७) स्वस्तात माघारी परतल्यावर बटलर व कर्णधार संजू सॅमसन (२१ चेंडूंत ३०) यांनी राजस्थानच्या डावाला आकार दिला. या दोघांनी ८२ धावांची भागीदारी रचली. पोलार्डने सॅमसनला बाद केल्यावर बटलरने शिम्रॉन हेटमायरच्या (१४ चेंडूंत ३५) साथीने फटकेबाजी केली. अखेर या दोघांना जसप्रीत बुमराने बाद केले. बटलरने यंदाच्या हंगामातील पहिले शतक झळकावले. एकीकडे इतर गोलंदाज निष्प्रभ ठरत असताना बुमराने चार षटकांत केवळ १७ धावांच्या मोबदल्यात तीन मोहरे टिपले. 

संक्षिप्त धावफलक

राजस्थान रॉयल्स : २० षटकांत ८ बाद १९३ (जोस बटलर १००, शिम्रॉन हेटमायर ३५; जसप्रीत बुमरा ३/१७, टायमल मिल्स ३/३५) विजयी वि. मुंबई इंडियन्स : २० षटकांत ८ बाद १७० (तिलक वर्मा ६१, इशान किशन ५४; यजुर्वेद्र चहल २/२६) १ मुंबई इंडियन्सकडून ‘आयपीएल’मध्ये अर्धशतक झळकावणारा तिलक वर्मा (वय : १९ वर्षे १४५ दिवस) सर्वात युवा खेळाडू ठरला.

मराठीतील सर्व आयपीएल २०२२ ( Ipl ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ipl 2022 indian premier league cricket mumbai winning streak butler century helped rajasthan win ysh

ताज्या बातम्या