आयपीएल २०२२ च्या ६४ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्जचा १७ धावांनी पराभव केला. या विजयासह ऋषभ पंतच्या संघाने गुणतालिकेत चौथे स्थान पटकावले आहे. आयपीएल २०२२ मध्ये दिल्लीने पहिल्यांदाच दोन सामने जिंकले आहेत, तर या पराभवानंतर पंजाबसाठी प्लेऑफची शर्यत आणखी कठीण झाली आहे. पंजाबकडे आता एक सामना शिल्लक आहे, जर संघाला तो जिंकता आला तर ते केवळ १४ गुणांपर्यंत पोहोचता येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोमवारी आयपीएल २०२२ मध्ये पंजाब किंग्जला दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध १७ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. पंजाब किंग्जकडून लियाम लिव्हिन्स्टोनने शानदार गोलंदाजी केली, ज्यामुळे दिल्ली कॅपिटल्सचा संघ २० षटकात ७ गडी गमावून १५९ धावाच करू शकला. लियाम लिव्हिंगस्टोनने चार षटकांत २७ धावांत तीन बळी घेतले. लिव्हिंगस्टोनने या काळात ऑफ आणि लेग स्पिन दोन्ही प्रकारे गोलंदाजी केली आणि विकेट्सही घेतल्या. ऑफ-स्पिनवर त्याने डेव्हिड वॉर्नर आणि ऋषभ पंतला पॅव्हेलियनमध्ये पाठवले, तर लेग-स्पिनवर रोव्हमन पॉवेलची विकेट घेतली.

वॉर्नर गोल्डन डकचा बळी ठरला, तर पंत तीन चेंडूत सात धावा काढून बाद झाला. पॉवेलला सहा चेंडूत केवळ दोन धावा करता आल्या. लिव्हिंगस्टोनची गोलंदाजी पाहून भारताचा माजी कसोटीपटू वसीम जाफरने गुरमीत राम रहीम सिंगचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो म्हणत आहे की तो लेग स्पिन, ऑफ स्पिन, विकेटकीपिंग आणि क्षेत्ररक्षण करू शकतो आणि तो एक संपूर्ण अष्टपैलू खेळाडू आहे. वसीम जाफरचे हे ट्विट खूप व्हायरल होत आहे.

दरम्यान, मयंक अग्रवालने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. डावाच्या पहिल्याच चेंडूवर लियाम लिव्हिंगस्टोनने डेव्हिड वॉर्नरला गोल्डन डकवर बाद करून दिल्ली कॅपिटल्सला पहिला धक्का दिला. यानंतर सरफराज १६ चेंडूत ३२ धावा करून बाद झाला. सरफराजनंतर ललित यादवने २४ धावा करत मिचेल मार्शला काही काळ साथ दिली, पण तो बाद झाल्यानंतर संघ पत्त्यासारखा कोसळला. ऋषभ पंत आणि पॉवेल यांनी आपापल्या विकेट्स फेकून दिल्या. मार्शने २८ चेंडूत ६३ धावांची शानदार खेळी खेळली. दिल्लीने २० षटकांत ७ गडी गमावून १५९ धावा केल्या.

१६० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या पंजाब किंग्जला जॉनी बेअरस्टो आणि शिखर धवन यांनी चांगली सुरुवात करून दिली. पंजाबला पहिला धक्का बेअरस्टो (२८) च्या रूपाने ३८ धावांवर बसला. बेअरस्टो बाद झाल्यानंतर पंजाबचा धावगती नियंत्रणात आला आणि पुढील ४४ धावांत संघाने ६ विकेट गमावल्या. जितेश शर्माने ३४ चेंडूत ४४ धावांची खेळी करून सामना नक्कीच रोमांचित करायचा प्रयत्न केला, पण तो शार्दुल ठाकूरसमोर टिकू शकला नाही. या सामन्यात शार्दुलने ४ विकेट घेतल्या आणि त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. पंजाबला २० षटकांत ९ गडी गमावून केवळ १४२ धावा करता आल्या.

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2022 jaffer remember gurmeet ram rahim singh after seeing the bowling of livingstone abn
First published on: 17-05-2022 at 15:52 IST