आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील आठवा सामना शुक्रवारी पार पडला. या सामन्यात केकेआरने दणदणीत विजय संपादन करत पंजाब किंग्जला धूळ चारली. पंजाबने दिलेले १३७ धावांचे लक्ष्य केकेआरने सहजरीत्या पूर्ण केले. मात्र या समन्यात भानुका राजपक्षे आणि कसिगो रबाडा यांनी कोलकाताचे टेन्शन वाढवले होते. मोठे प्रयत्न केल्यानंतर या दोन्ही फलंदाजांना बाद करण्यात कोलकाताच्या गोलंदाजांना यश आले. केकेआरच्या टीम साऊदीने कसिगो रबाडाचा झेल टिपताना तर अप्रतिम झेप घेतली. टीम साऊदीच्या या कॅचची सगळीकडे चर्चा होत आहे.

पंजाबने आपल्या डावात एकूण १३७ धावा केल्या. ही धावसंख्या उभारण्यासाठी भानुका राजपक्षेने धमाकेदार फटकेबाजी करत ९ चेंडूंमध्ये तीन षटकार तसेच तीन चौकार लगावत ३१ धावा केल्या. त्यानंतर मात्र पंजाबचे एकएक खेळाडू बाद होत गेले. शेवटी दहाव्या विकेटसाठी आलेल्या कसिगो रबाडाने संघाला सावरण्याचा प्रयत्न केला.त्याने १६ चेंडूंमध्ये एक षटकार आणि चार चौकार यांच्या मदतीने २५ धावा केल्या. रबाडा कशाचीही पर्वा न करता मोठे फटके मारत होता. रबाडा अशाच पद्धतीने फलंदाजी करत राहिला तर कोलकातासाठी ते जिकरीचे ठरले असते.

https://www.iplt20.com/video/41730/safe-hands-southee-pulls-off-another-stunner

त्यामुळे केकेआरने आंद्रे रसेलकडे चेंडू दिला. १९ वे षटक टाकण्याची जबाबदारी आंद्रे रसेलने घेतली. दरम्यान, १९ व्या षटकात पहिल्याच चेंडूवर रबाडाने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी चेंडू हवेत झेपावला. त्यानंतर कोलकाताचा क्षेत्ररक्षक टीम साऊदीने जोराची धाव घेऊन मोठी झेप घेत रबाडाचा झेल टिपला. साऊदीने झेप घेतल्यानंतर त्याचे पूर्ण शरीर हवेत होते. त्यामुळे त्याच्या या कामगिरीची सगळीकडे चर्चा होत आहे. त्याने झेल टिपल्यानंतरच पंजाबचा खेळ १३७ धावांवर गुंडाळला.