इंडियन प्रीमियर लीगच्या १५ व्या हंगामात, कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध राजस्थान रॉयल्सचा सामना सोमवारी ब्रेबॉर्न स्टेडियमवर झाला. दोन्ही संघांमधील मोठ्या धावसंख्येच्या सामन्यात राजस्थानने सात धावांनी विजय मिळवला. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने २० षटकांत पाच गडी गमावून २१७ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्स संघ १९.४ षटकांत १० गडी गमावून २१० धावाच करू शकला. युझवेंद्र चहलला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. या सामन्यात एक वेळ अशीही आली होती जेव्हा कोलकाताच्या डावात कर्णधार श्रेयस अय्यर आपला सहकारी खेळाडू व्यंकटेश अय्यरवर चांगलाच रागावलेला दिसत होता.

श्रेयसला दोन धावा घ्यायच्या होत्या. पण व्यंकटेशने नकार दिल्याने केकेआरच्या कर्णधाराने आरडाओरडा करत व्यंकटेशला फटकारण्यास सुरुवात केली. कोलकात्याच्या डावाच्या १६व्या षटकात ट्रेंट बोल्ट गोलंदाजी करत होता. व्यंकटेशने या षटकातील सहावा चेंडू डीप बॅकवर्ड पॉइंटकडे खेळला. यावर कर्णधार श्रेयसला दोन धावा घ्यायच्या होत्या आणि अर्ध्या खेळपट्टीपर्यंत तो धावून आला होता.

मात्र व्यंकेशने धाव घेण्यास नकार दिला. यानंतर श्रेयस चांगलाच संतापलेला दिसला आणि त्याने व्यंकटेशला खूप फटकारले. एवढेच नाही तर कर्णधार श्रेयस व्यंकटेशवर ओरडतानाही दिसला. मात्र, व्यंकटेश गप्प बसून कर्णधाराचे म्हणणे ऐकत असल्याचे दिसून आला. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

श्रेयसने ५१ चेंडूंत सात चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने ८५ धावा केल्या. दुसरीकडे व्यंकटेशला सात चेंडूत केवळ सहा धावा करता आल्या. श्रेयस आपल्या फलंदाजीच्या बळावर कोलकाताला विजयापर्यंत नेत होता, मात्र त्यानंतर १७व्या षटकात युझवेंद्र चहलने संपूर्ण सामना पालटून टाकला. कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यर, शिवम मावी आणि पॅट कमिन्स यांना बाद करून चहलने या षटकात आपली हॅट्ट्रिक पूर्ण केली. या मोसमात हॅट्ट्रिक घेणारा चहल पहिला गोलंदाज ठरला आहे. त्याने सामन्यात चार षटकात ४० धावा देत पाच बळी घेतले आणि त्यासाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.