मुंबई : कोलकाता नाइट रायडर्सची इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमधील आतापर्यंतची कामगिरी संमिश्र असली तरी जोखीम पत्करण्याची वृत्ती कायम राखत शुक्रवारी पंजाब किंग्ज संघाशी सामना करणार आहे. या सामन्यात आक्रमकतेचा कस लागणार आहे.

कोलकाताने चेन्नई सुपर किंग्जला नमवून हंगामाचा विजयी आरंभ केला, परंतु शुक्रवारी अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या दुसऱ्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुकडून पराभव पत्करला. पंजाबच्या फलंदाजांनी बंगळूरुचे दोनशे धावांचे लक्ष्य पेलण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, परंतु त्यांच्या गोलंदाजांना कामगिरी सुधारावी लागणार आहे.  वानखेडे स्टेडियमवर आतापर्यंत झालेल्या दोन सामन्यांत फलंदाजी करणे आव्हानात्मक ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

भक्कम सलामीची अपेक्षा

कोलकाताचा सलामीवीर अजिंक्य रहाणे आणि आक्रमक वेंकटेश अय्यर बंगळूरुच्या गोलंदाजीसमोर तग धरू शकले नाहीत. या दोघांकडून भक्कम सलामीची अपेक्षा आहे. लयीत असलेला कर्णधार श्रेयस अय्यर बंगळूरुविरुद्ध अपयशी ठरला. परंतु डावखुरा फलंदाज नितीश राणासारख्या फलंदाजांकडून त्याला तोलामोलाची साथ आवश्यक आहे. याशिवाय सॅम बििलग्ज, शेल्डन जॅक्सन आणि स्फोटक फलंदाज आंद्रे रसेल यांच्यावर मधल्या फळीची जबाबदारी असेल.

रबाडा खेळणार?

दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कॅगिसो रबाडाने तीन दिवसांचे विलगीकरण पूर्ण केल्यामुळे आगामी सामन्यात खेळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे पंजाबच्या आक्रमणाची धार वाढू शकेल. पंजाबच्या धावांचे समीकरण प्रामुख्याने कर्णधार मयांक अगरवाल, धडाकेबाज फलंदाज शिखर धवन आणि श्रीलंकेच्या भानुका राजपक्षावर अवलंबून आहे. बंगळूरुविरुद्ध भानुकाने विजयवीराची कामगिरी बजावली होती. मधल्या फळीतील ओडीन स्मिथ आणि एम. शाहरूख खान यांच्या आक्रमक फलंदाजीमुळे बंगळूरुला एक षटक राखून सामना जिंकता आला. ‘आयपीएल’ पदार्पणात शून्यावर बाद झालेल्या राज बावा या भारताच्या युवा विश्वचषकातील खेळाडूला आणखी एक संधी मिळते का पाहणे, उत्सुकतेचे ठरेल. पंजाबच्या गोलंदाजांवर बंगळूरुच्या फॅफ डय़ू प्लेसिसने जोरदार हल्ला चढवला. संदीप शर्मा, अर्शदीप सिंग आणि स्मिथ यांनी कामगिरी उंचावण्याची आवश्यकता आहे. राहुल चहर आणि हरप्रीत ब्रार यांच्या फिरकीची आठ षटकेसुद्धा निर्णायक ठरू शकतील.

वेळ : सायंकाळी ७.३० वा. ’  थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी, सिलेक्ट १