आयपीएल २०२२ च्या ३७ व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने पाचवेळा चॅम्पियन असलेल्या मुंबई इंडियन्सचा ३६ धावांनी पराभव करून मोसमातील आपला पाचवा विजय नोंदवला. लखनऊच्या १६९ धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना मुंबईचा संघ १३२ धावाच करू शकला. लखनविरुद्धचा पराभव हा आयपीएलच्या या मोसमातील मुंबईचा आठवा पराभव होता. या पराभवानंतर मुंबई इंडियन्सचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. एखाद्या संघाने सुरुवातीचे आठ सामने गमावण्याची ही पहिलीच वेळ आहे. या नंतर दु:खी झालेले मुंबईचे प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी मुंबईच्या पराभवाचे खापर फलंदाजीवर फोडले आहे. या सामन्यात मुंबईची फलंदाजी पुन्हा निष्फळ ठरली.

प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी फलंदाजीमध्ये वारंवार अपयश आल्यानंतर काही बदलांचे संकेत दिले आहेत आणि सलामीवीर इशान किशनच्या खेळाबद्दल देखील चिंता व्यक्ती केली आहे. मला याचा आढावा घ्यावा लागेल आणि बाकीच्या प्रशिक्षकांशी बोलून करून काही योजना बनवाव्या लागतील, असे जयवर्धनेने स्पर्धेच्या पुढे फलंदाजीतील संभाव्य बदलांबद्दल विचारले असता म्हटले आहे.

या पराभवानंतर मुंबईचे प्रशिक्षक महेला जयवर्धने यांना संघाच्या कामगिरीने खूप दु:ख झाले. “आम्हाला यावर विचारमंथन करण्याची गरज आहे. मी याबाबत बाकीच्या प्रशिक्षकांशी बोलेन. फलंदाजीत काही समस्या आहे. आम्ही आमच्या क्षमतेनुसार फलंदाजी केलेली नाही. आम्हाला प्रथम फलंदाजी करताना आणि लक्ष्याचा पाठलाग करताना अडचणी आल्या. या प्रकारच्या स्पर्धेत, गोलंदाजीची बाजू सामन्यावर नियंत्रण ठेवते. आम्ही आमच्या क्षमतेनुसार गोलंदाजी केली नाही आणि सुरुवातीला विकेट घेण्यात अपयशी ठरलो. आमच्याविरुद्ध विरोधी संघाच्या फलंदाजांनी शतकी खेळी केली,” असे महेला जयवर्धने म्हटले आहे.

“फलंदाजी हा आमच्यासाठी चिंतेचा विषय आहे. काही चांगल्या विकेट्सवर आम्ही आमची योजना पूर्ण करण्यात अपयशी ठरलो. आम्हाला आमच्या फलंदाजीत सातत्य आणावे लागेल. आपण पुढे जात राहणे आवश्यक आहे आणि आपल्याला ते बदल करायचे असल्यास आपण ते करू,” असे जयवर्धनेने म्हटले

“आम्ही खरोखर चांगली गोलंदाजी केली पण मला वाटते की केएल राहुलने एक विशेष खेळी खेळली. तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत बाद झाला नाही. परिस्थिती नियंत्रणात कशी आणायची हे त्याला चांगलेच माहीत होते. आम्ही सातत्याने विकेट्स मिळवल्या पण काही प्रसंगी आम्ही राहुलला थोडी मोकळीक दिली आणि तो काही चौकार आणि षटकार मारण्यात यशस्वी झाला. त्यामुळे त्याच्यावर दबाव नव्हता, असे महेला जयवर्धने म्हणाला.

१६९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात चांगली झाली नाही आणि इशान किशनने केवळ आठ धावा केल्या. कर्णधार रोहित शर्माने ३९ आणि तिलक वर्माने ३८ धावा केल्या मात्र विजयासाठी ते पुरेसे नव्हते. यावेळी मुंबईचा संघ गोलंदाजीतही कमकुवत ठरला आहे. जसप्रीत बुमराह एका टोकाकडून चांगली गोलंदाजी करत असला तरी त्याला दुसऱ्या टोकाकडून साथ मिळाली नाही.

या सामन्यात लखनऊचा कर्णधार केएल राहुलने मोसमातील दुसरे शतक झळकावले. त्याने मुंबईविरुद्ध १०३ धावांची खेळी खेळली होती. गोलंदाजीत कृणाल पांड्याने तीन बळी घेत संघाला ३६ धावांनी विजय मिळवून दिला. राहुलचे हे मोसमातील दुसरे शतक आहे. त्याने मुंबईविरुद्धच्या दोन्ही शतकी खेळी खेळल्या आहेत.