scorecardresearch

इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट : आघाडीच्या फलंदाजीची दोन्ही संघांना चिंता ; आज चेन्नईचा सामना लखनऊशी

ब्रेबॉर्न स्टेडियमवर नाणेफेकीचा कौलसुद्धा महत्त्वाचा ठरणार आहे, कारण दुसऱ्या डावात दवाचा घटक महत्त्वाचा ठरत आहे.

पीटीआय, मुंबई

तारांकित अष्टपैलू खेळाडू मोईन अली संघात सामील झाल्यामुळे गुरुवारी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमध्ये होणाऱ्या लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या लढतीत फलंदाजीची कामगिरी सुधारण्याचा चेन्नई सुपर किंग्जचा प्रयत्न असेल.

चेन्नई आणि लखनऊ या दोन्ही संघांनी आपापले सलामीचे सामने गमावले आहेत. आघाडीच्या फळीचे अपयश ही दोन्ही संघांचा सामायिक समस्या आहे. याशिवाय ब्रेबॉर्न स्टेडियमवर नाणेफेकीचा कौलसुद्धा महत्त्वाचा ठरणार आहे, कारण दुसऱ्या डावात दवाचा घटक महत्त्वाचा ठरत आहे. चेन्नई आणि लखनऊ या दोन्ही संघांनी वानखेडे स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करीत सामने गमावले आहेत.

राहुल, डीकॉककडून अपेक्षा

लखनऊचा कर्णधार केएल राहुल आणि भरवशाचा सलामीवीर क्विंटन डीकॉक यांनी पहिल्या सामन्यात घोर निराशा केली. राहुलने आघाडीवर राहून मोठी खेळी उभारण्याची आवश्यकता आहे. याचप्रमाणे त्याच्या फलंदाजीच्या कौशल्याचाही कस लागणार आहे. मनीष पांडे आणि एव्हिन लेविस यांच्याकडून फटकेबाजीची अपेक्षा आहे. पहिल्या लढतीत आघाडीची फळी कोसळल्यावर मधल्या फळीतील दीपक हुडा, पदार्पणवीर आयुष बडोनी आणि कृणाल पंडय़ा या तिघांनी संघाचा डाव सावरला. लखनऊच्या गोलंदाजांनीही गुजरात जायंट्सविरुद्धच्या पराभवातून सावरत नव्या आव्हानासाठी सज्ज व्हायला हवे. वेगवान गोलंदाज दुष्मंता चमीराने लिलावातील आकडय़ाला न्याय देताना २२ धावांत २ बळी घेतले. परंतु साथीदार आवेश खानने मात्र ३.४ षटकांत ३३ धावा दिल्या.

मोईन तिसऱ्या क्रमांकावर?

कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात चेन्नईला फक्त १३१ धावा काढता आल्या होत्या. या धावसंख्येत महेंद्रसिंह धोनीच्या नाबाद ५० धावांचे महत्त्वाचे योगदान होते. गतहंगामात सर्वाधिक धावा काढणारा ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉन्वे, अंबाती रायुडू, शिवम दुबे हे फलंदाज अपयशी ठरले. नवा कर्णधार रवींद्र जडेजा आणि रॉबीन उथप्पा यांनी आपली भूमिका चोख बजावली. लखनऊविरुद्ध मोईनला तिसऱ्या क्रमांकावर संधी दिली जाऊ शकते. ड्वेन प्रीटोरियस हासुद्धा पर्याय चेन्नईकडे उपलब्ध आहे. कोलकाताविरुद्ध अष्टपैलू ड्वेन ब्राव्होने टिच्चून गोलंदाजी करताना २० धावांत ३ बळी मिळवले. अन्य गोलंदाजांना मात्र आपला प्रभाव दाखवता आला नाही. तुषार देशपांडे, अ‍ॅडम मिल्ने, मिचेल सँटनर, जडेजा, दुबे यांच्यासारखे गोलंदाज चेन्नईकडे आहेत.

विल्यम्सनला दंड

पुणे : सनरायजर्स  हैदराबाद संघाचा कर्णधार केन विल्यम्सनला षटकांची गती धिमी राखल्याबद्दल १२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या स्टेडियमवर मंगळवारी झालेल्या सामन्यात हैदराबादने राजस्थान रॉयल्सकडून ६१ धावांनी पराभव पत्करला.

* वेळ : सायं.७.३०वा.  * थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १ * १ हिंदी, सिलेक्ट १

मराठीतील सर्व आयपीएल २०२२ ( Ipl ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ipl 2022 lucknow super giants vs chennai super kings match prediction zws

ताज्या बातम्या