मुंबई : हंगामातील पहिल्या विजयाच्या शोधात असलेल्या मुंबई इंडियन्स संघापुढे शनिवारी ‘आयपीएल’मध्ये लखनऊ सुपर जायंट्स संघाचे आव्हान असेल.

मुंबईच्या संघाला यंदा हंगामाच्या सुरुवातीलाच सलग पाच सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे. तसेच प्रत्येक सामन्यात मुंबईच्या संघात बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे या सामन्यात कोणत्या खेळाडूंना संधी मिळणार, याकडे चाहत्यांचे लक्ष असेल. मुंबईच्या फलंदाजीची भिस्त पुन्हा कर्णधार रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांच्यावर असेल. त्यांना युवा डेवॉल्ड ब्रेविस आणि तिलक वर्मा यांची साथ लाभेल. गोलंदाजीत जसप्रीत बुमरा चांगली कामगिरी करत असून इतरांना छाप पाडता आलेली नाही.

दुसरीकडे, केएल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनऊला पाचपैकी तीन सामने जिंकण्यात यश आले आहे. त्यांच्यासाठी कर्णधार राहुलसह यष्टीरक्षक-फलंदाज क्विंटन डीकॉक, अष्टपैलू कृणाल पंडय़ा, वेगवान गोलंदाज आवेश खान आणि लेग-स्पिनर रवी बिश्नोई महत्त्वाची भूमिका बजावतील.

* वेळ : दु. ३.३० वा. * थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी (संबंधित एचडी वाहिन्यांवर)