इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) बुधवारी मुंबई इंडियन्सच्या संघांनी पराभवाची हॅट-ट्रीक नोंदवली. कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या लढतीत मुंबईचं पारडे जड मानलं जात होतं. मात्र पॅट कमिन्सने मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीची पिसं काढत कोलकात्याला शानदार विजय मिळवून दिला. पॅट कमिन्सने तर या डावात १५ चेंडूंमध्ये तब्बल ५६ धावा करत विक्रमाला गवसणी घालण्याबरोबरच चार षटकं बाकी असतानाच संघाला विजय मिळवून दिला. विशेष म्हणजे या कामगिरीबद्दल स्वत: कमिन्सलाही आश्चर्य वाटत आहे.

आपल्या खेळीचं आपल्यालाच आश्चर्य वाटल्याचं कमिन्सनं कबूल केलंय. सामनावीर पुरस्कार पटकावल्यानंतर बोलताना कमिन्सनं, “या खेळीमुळं मीच सर्वाधिक आश्चर्यचकित झालोय. या धावा माझ्या हातून होऊन गेल्या. मी फार विचार करत नव्हतो. खरं तर हे वास्तवात अधिक समाधानकारक आहे. बॉल हवेत तरंगतोय असं मला वाटत होतं,” असं म्हटलंय. सीमारेषा आकाराने लहान असणाऱ्या भागांमध्ये फटकेबाजी करण्याचा माझा प्रयत्न होता. संघाने माझ्यावर विश्वास ठेऊन मला संधी दिली त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे, असंही कमिन्स म्हणाला.

कर्णधार श्रेयस अय्यरने आपण नियोजित प्लॅनप्रमाणे खेळलो आणि त्यानुसारच सामन्यात विजय मिळावला. कमिन्सने अपेक्षेपेक्षा आधीच संघाला विजय मिळवून दिल्याचंही अय्यटरने सांगितलं. कमिन्सने केलेल्या तुफान फटकेबाजीमुळे कोलकात्याने १६२ धावांचं लक्ष्य केवळ १६ षटकांमध्ये पुर्ण केलं.

अय्यरने कमिन्सचं कौतुकही केलं. “मी केवळ चेंडू हवेत तरंगताना पाहत होता. मला विश्वास बसत नव्हता. ही फार भन्नाट खेळी होती. आम्ही पुढील विचार करत होतो पण त्यापूर्वीच कमिन्सने सामना संपवला,” असं अय्यर म्हणाला. मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा सुद्धा कमिन्सची खेळी पाहून आश्चर्यचकित झाला. तो अशाप्रकारे खेळेल असा मी विचार केला नव्हता, असं रोहितने म्हटलंय. ज्या पद्धतीने कमिन्सने फटकेबाजी करत विजय मिळवून दिला त्याचं संपूर्ण श्रेय त्यालाच जातं. १५ व्या षटकापर्यंत आम्ही सामन्यामध्ये होतो पण कमिन्सने सगळी गणितं बिघडवली, असं रोहित म्हणाला.

मुंबईने दिलेले १६२ धावांचे लक्ष्य गाठताना कोलकाता संघ अडचणीत सापडला होता. कोलकाताची १०१ धावा पाच गडी बाद अशी स्थिती झाली होती. मात्र रसेल बाद झाल्यानंतर आलेल्या पॅट कमिन्सने पूर्ण सामनाच फिरवून टाकला. मैदावर येताच त्याने चौकार आणि षटकार यांचा अक्षरश: पाऊस पाडला. त्याने अवघ्या १५ चेंडूंमध्ये तब्बल ५६ धावा करून कोलकाताला विजय मिळवून दिला.

या धमाकेदार फलंदाजीनंतर पॅट कमिन्सच्या नावावर अनोख्या विक्रमाची नोंद झाली आहे. पॅट कमिन्सने फक्त १५ चेंडूमध्ये तब्बल ५६ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने सहा षटकार आणि चार चौकार लगावले आहेत. त्याच्या या खेळामुळे काही क्षणात सामना कोलकाताच्या बाजूने फिरला. त्याच्या या खेळानंतर तो आयपीएलच्या इतिहासात सर्वात जास्त वेगाने अर्धशतक करणारा दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू ठरला आहे.

पहिल्या क्रमांकावर केएल राहुल असून त्याने २०१८ मध्ये दिल्ली कॅपिटल्सविरोधात खेळत असताना १४ चेंडूंमध्ये अर्धशतक केले होते.