आयपीएल २०२२ च्या ३७ व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने पाचवेळा चॅम्पियन असलेल्या मुंबई इंडियन्सचा ३६ धावांनी पराभव करून मोसमातील आपला पाचवा विजय नोंदवला. लखनऊच्या १६९ धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना मुंबईचा संघ १३२ धावाच करू शकला. या सामन्यात मुंबईची फलंदाजी पुन्हा निष्फळ ठरली. मुंबईच्या संघाला स्फोटक फलंदाज केरॉन पोलार्डकडून खूप आशा होत्या, पण तोही २० चेंडूत १९ धावा करून बाद झाला. सामन्याच्या शेवटच्या षटकात कृणाल पांड्याने पोलार्डला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. कृणालने पोलार्डला बाद केल्यानंतर त्यावेळी मैदानावर वेगळेच दृश्य पाहायला मिळाले.

कृणालने पोलार्डला दीपक हुडाच्या हस्ते डीप मिडविकेटवर झेलबाद केले. सामन्यात पोलार्डला एकच षटकार मारता आला. आऊट झाल्यानंतर तो पॅव्हेलियनच्या दिशेने जात असताना कृणालने पोलार्डच्या डोक्याचे चुंबन घेतले. कृणालचे हे कृत्य कॅमेऱ्यातही कैद झाले होते, जे सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. मात्र, पोलार्डने कृणालच्या कृतीवर प्रतिक्रिया दिली नाही आणि काहीही न बोलता पॅव्हेलियनच्या दिशेने निघून गेला. पोलार्डला बाद केल्यानंतर कृणालने त्याच षटकात डॅनियल सॅमची विकेटही घेतली.

कृणालने या सामन्यात चार षटकात केवळ १९ धावा दिल्या आणि त्याला तीन विकेट मिळाल्या. सामन्याच्या पहिल्या डावात पोलार्डने कृणालला बाद केले, तर दुसऱ्या डावात कृणालने पोलार्डला बाद करत बरोबरी साधली. फलंदाजीत कृणाल केवळ एक धाव काढत पोलार्डच्या चेंडूवर झेलबाद झाला. त्याचवेळी पोलार्डने उत्कृष्ट गोलंदाजी करत दोन षटकात केवळ आठ धावा देत दोन विकेट्स घेतल्या. यापूर्वी कृणाल मुंबई इंडियन्स संघाचा भाग होता. पण या हंगामात तो लखनऊ सुपर जायंट्स संघाकडून खेळत आहे.

सामना संपल्यानंतर कृणालने पोलार्डला बाद केल्याबद्दल म्हटले की, “मी पोलार्डला आऊट केल्याबद्दल मी खूप आनंदी होतो. नाहीतर त्याने मला आऊट केल्याचे सांगत आयुष्यभर माझे डोके खाल्ले असते. आता आमच्यात १-१ अशी बरोबरी झाली आहे. निदान तो आता हे बोलणार नाही याचा मला आनंद आहे.”

कृणालचा हा पोलार्डसाठी एक मैत्रीपूर्ण निरोप होता. परंतु पोलार्ड कोणत्याही खेळाच्या मूडमध्ये दिसत नव्हता आणि तो कोणतीही प्रतिक्रिया न देता निघून गेला. भारताचे दिग्गज सुनील गावसकर यांनीही समालोचन करताना म्हटले की, हा खेळ अजूनही सुरू असल्याने हे हावभाव योग्य नव्हते.

दरम्यान, पाच वेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्सला रविवारी लखनऊ सुपर जायंट्सकडून ३६ धावांनी पराभव पत्करावा लागला. कर्णधार लोकेश राहुलच्या नाबाद १०३ धावांच्या जोरावर लखनऊने गोलंदाजांच्या कामगिरीच्या जोरावर मुंबई इंडियन्सला ८ बाद १३२ धावांवर रोखले. या पराभवानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा चांगलाच संतापलेला दिसला. कोणताही फलंदाज जबाबदारी घेण्यास तयार नाही, असे रोहितने म्हटले आहे.