आज पंजाब किंग्जचे आव्हान; रोहितकडे लक्ष

पुणे : चार सामन्यांनंतरही विजयाची पाटी कोरी असणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाचे दमदार कामगिरीचे ध्येय असून इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये बुधवारी त्यांच्यापुढे पंजाब किंग्जचे आव्हान असेल.

मुंबईच्या संघाला यंदाच्या हंगामात फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तीनही क्षेत्रांमध्ये चांगली कामगिरी करण्यात अपयश आले आहे. विशेषत: रोहित शर्माला फलंदाज आणि कर्णधार म्हणून फारसे यश लाभलेले नाही. त्यामुळे त्याचा कामगिरीत सुधारणेचा प्रयत्न असेल. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुविरुद्धच्या गेल्या सामन्यात मुंबईने केवळ दोन परदेशी खेळाडूंसह खेळण्याचा निर्णय घेतला. पंजाबविरुद्ध मुंबईचा संघ हीच रणनीती कायम ठेवतो का, याकडे चाहत्यांचे लक्ष असेल.

दुसरीकडे, मयांक अगरवालच्या नेतृत्वाखालील पंजाबला यंदा सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही. त्यांनी दोन सामने जिंकले असून दोन सामने गमावले आहेत.

* वेळ : सायं. ७.३० वा. * थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी (संबंधित एचडी वाहिन्यांवर)