पीटीआय, मुंबई : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या यंदाच्या हंगामातील बहुतांश सामने मुंबईतील तीन मैदानांवर होणार असले, तरी याचा आम्हाला अतिरिक्त फायदा होणार नाही. आमच्या संघात यंदा बऱ्याच नव्या खेळाडूंचा समावेश असून त्यांना मुंबईत खेळण्याचा फारसा अनुभव नाही, असे मत पाच वेळा ‘आयपीएल’ विजेत्या मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्माने व्यक्त केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा ‘आयपीएल’चे सर्व साखळी सामने वानखेडे स्टेडियम, ब्रेबॉर्न स्टेडियम आणि डी. वाय. पाटील स्टेडियम या मुंबईतील तीन मैदानांसह गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटना स्टेडियममध्ये खेळवले जाणार आहेत. त्यामुळे मुंबईला जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. ‘‘लिलावामध्ये आम्ही बऱ्याच नव्या खेळाडूंना खरेदी केले. आमच्या संघातील ७० ते ८० टक्के खेळाडूंना मुंबईतील मैदानांवर खेळण्याचा फारसा अनुभव नाही. त्यामुळे मुंबईत बहुतांश सामने होणार असल्याचा आम्हाला अतिरिक्त फायदा होईल असे म्हणणे योग्य ठरणार नाही,’’ असे रोहित बुधवारी पत्रकार परिषदेत म्हणाला.

‘‘माझ्यासह केवळ सूर्यकुमार यादव, इशान किशन, किरॉन पोलार्ड आणि जसप्रीत बुमरा यांनीच मुंबईत बरेच सामने खेळले आहेत. मात्र, त्याव्यतिरिक्त आमचे बरेचसे खेळाडू पहिल्यांदा मुंबईतील मैदानांवर सामने खेळतील. दोन वर्षांत आम्हाला मुंबईत एकही सामना खेळण्याची संधी मिळालेली नसून उलट इतर संघांचे इथे सामने झाले आहेत,’’ असेही रोहितने सांगितले.

सूर्यकुमारबाबत अनिश्चितता!

मुंबईचा पहिला सामना २७ मार्च रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध रंगणार आहे. या सामन्यासाठी अनुभवी फलंदाज सूर्यकुमारच्या उपलब्धतेबाबत साशंकता असल्याचे रोहित म्हणाला. सूर्यकुमारच्या हाताच्या अंगठय़ाला दुखापत झाली होती. ‘‘सूर्यकुमार सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत असून दुखापतीतून सावरत आहे. मात्र, तो पहिल्या सामन्यात खेळणार की नाही, हे सांगणे अवघड आहे,’’ असे रोहितने स्पष्ट केले.

दोन ‘डीआरएस’ उपयुक्त!

यंदा ‘आयपीएल’ सामन्यांत संघांना प्रत्येक डावात दोन ‘डीआरएस’ वापरण्याची संधी मिळेल. हा बदल स्वागतार्ह असल्याचे रोहितने नमूद केले. ‘‘दोन ‘डीआरएस’ उपयुक्त ठरतील. त्यामुळे चुकांची संख्या कमी होईल. तसेच ‘मंकिडग’ला अधिकृत मान्यता मिळाल्याने आता नॉन-स्ट्राइकवरील फलंदाजांना अधिक सावध राहावे लागेल,’’ असे रोहित म्हणाला.

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2022 no extra advantage playing in mumbai captain rohit sharmas opinion ipl matches ysh
First published on: 24-03-2022 at 01:53 IST