scorecardresearch

PBKS VS DC : करोनामुळे दिल्ली-पंजाब यांच्यातील सामन्याचे ठिकाण बदलले, आता मुंबईत लढत रंगणार

दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यातील पाच जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

DELHI CAPITALS
दिल्ली कॅपिटल्स

आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला सुरुवात होऊन तीन आठवडे झालेले आहेत. सर्व सामने सुरळीत सुरु असताना आता दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यातील पाच जणांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. याच कारणामुळे खबरदारी म्हणून बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. येत्या २० एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात होणारा सामना हा पुणेऐवजी मुंबईत खेळवला जाणार आहे. प्रवासादरम्यान करोना संसर्ग होण्याची शक्यता असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

दिल्लीच्या ताफ्यात एकूण पाच जणांना करोनाची लागण

दिल्लीच्या ताफ्यात एकूण पाच जणांना करोनाची लागण झाली आहे. दिल्लीच्या संघाचे फिजिओथेरपिस्ट पॅट्रिक फरहार्ट यांना करोनाची लागण झाल्याचे १५ एप्रिल रोजी समोर आले होते. मसाज थेरेपिस्ट चेतन कुमार यांनादेखील करोनाची लागण झाल्याचे १६ एप्रिल रोजी समोर आले होते. तर १८ एप्रिल रोजी दिल्लीचा खेळाडू मिशेल मार्श, टीमचे डॉक्टर अभिजित साळवी आणि सोशल मीडिया कंटेट टीमचे सदस्य आकाश माने या तिघांना करोना करोनाची लागण झाली होती. पाच जणांना करोनाची लागण झाल्यामुळे दिल्ली संघाने आपला पुणे प्रवास तत्काळ रद्द केला होता.

पुण्यातील सामना मुंबईला होणार

त्यानंतर करोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता असल्यामुळे बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. २० एप्रिल रोजी दिल्ली आणि पंजाब यांच्यात पुणे येथील एमसीए स्टेडियमवर सामना होणार होता. मात्र हा सामना आता पुणे ऐवजी मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे. मुंबई ते पुणे प्रवास टाळण्यासाठी बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे.

मराठीतील सर्व आयपीएल २०२२ ( Ipl ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ipl 2022 pbks vs dc venue of delhi capitals vs punjab kings matches shifted from pune to mumbai due to corona prd