scorecardresearch

कोलकाताचा सहा गडी राखून दणदणीत विजय, पंजाबवर मात केली अन् आंद्रे रसेल, उमेश यादव ठरले ‘किंग’

पंजाबने दिलेले १३८ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी फलंदाजीसाठी उतरलेल्या कोलकाताची सुरुवात चांगली झाली नाही.

KKR VS PBKS
कोलकाताने पंजाबला धूळ चारली (iplt20.com)

कोलकाता आणि पंजाब यांच्यात झालेल्या अटीतटीच्या लढतीत कोलकाताने सहा गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयानंतर गुणतालिकेत कोलकाता प्रथम स्थानावर पोहोचला असून पंजाब सातव्या क्रमांकावर आहे. कोलकाताच्या या विजयाचे शिलेदार आंद्रे रसेल आणि गोलंदाज उमेश यादव ठऱले. आंद्रे रसेलने नाबाद ७० धावा करुन संघाला विजयापर्यंत नेलं. तर गोलंदाज उमेश यादवने चार बळी घेतल्यामुळे पंजाबला फक्त १३७ धावा करता आल्या.

पंजाबने दिलेले १३८ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी फलंदाजीसाठी उतरलेल्या कोलकाताची सुरुवात चांगली झाली नाही. संघ १४ धावांवर असताना सलामीला आलेला अजिंक्य राहाणे रबाडाने फेकलेल्या चेंडूवर झेलबाद झाला. ओडेन स्मिथने त्याचा झेल टिपला. तर राहाणेसोबत सलामीला आलेल्या व्यंकटेश अय्यरनेही पुरती निराशा केली. अय्यर ओडेन स्मिथच्या चेंडूवर अवघ्या तीन धावांवर झेलबाद झाला.

अय्यर बाद झाल्यानंतर ३० धावांवर दोन गडी बाद अशी कोलकाताची स्थिती झाली. त्यानंतर तिसऱ्या विकेटसाठी आलेल्या कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यरने संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. त्याने १५ चेंडूमध्ये पाच चौकारांच्या मदतीने २६ धावा केल्या. मात्र अय्यरने राहुल चहरच्या चेंडूवर फटका मारल्यानंतर चेंडू अलगदपणे रबाडाच्या हातात विसावला. त्यानंतर मधल्या फळीतील नितीश राणाने तर एकही धाव केली नाही. राहुल चहरने फेकलेल्या चेंडूचा सामना करताना तो पायचित झाला. नितीश राणाच्या विकेटनंतर कोलकाताची सातव्या षटकात ५१ धावा चार गडी बाद अशी दयनीय स्थिती झाली. या विकेटनंतर सामना पंजाबच्या बाजूने झुकला.

त्यानंतर मात्र आंद्रे रसेलने संघाला सावरत नाबाद खेळी केली. त्याने ३१ चेंडूंमध्ये आठ षटकार आणि दोन चौकार यांच्या मदतीने ७० धावा केल्या. तर त्याला सॅम बिलिंग्सने (नाबाद) साथ देत २३ चेंडूंमध्ये २४ धावा केल्या. दोघांच्या या भागिदारीमुळे कोलकाता संघाने आजच्या सामन्यावर नाव कोरलं.

यापूर्वी, नाणेफेक जिंकत कोलकाताने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पंजाब किंग्जकडून कर्णधार मयंक अग्रवाल आणि शिखर धवन ही जोडी सलामीला उतरली. मात्र ही जोडी काही खास कामगिरी करु शकली नाही. अग्रवाल पाच चेंडू खेळून अवघी एक धाव करुन बाद झाला. उमेश यादवेने टाकलेल्या चेंडूवर तो धावचित झाला. त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी भानुका राजपक्षे मैदातान उतरला. भानुकाने संघाला सावरण्याचा चांगला प्रयत्न केला. मैदानात उतरल्यापासूनच भानुकाने आक्रमक फलंदाजी करत अवघ्या ९ चेंडूंमध्ये तीन चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ३१ धावा केल्या. मात्र शिवम मावीच्या चेंडूंवर तो झेलबाद झाला.

यानंतर मात्र पंजाबचा एकही खेळाडू चांगली कामगिरी करु शकला नाही. शिखर धवनने १५ चेंडूमध्ये १६ धावा केल्या. तर पंजाबचा संघ ७८ धावांवर असताना लिआम लिव्हिंगस्टोनच्या रुपात चौथा गडी बाद झाला. लिव्हिंगस्टोनने २६ चेंडूंमध्ये एक चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने १९ धावा केल्या. लिव्हिंगस्टोन बाद झाल्यानंतर पाचव्या विकेटसाठी राज बावा मैदानात उतरला. मात्र बावादेखील चांगली कामगिरी करु शकला नाही. बावाने १३ चेंडूंमध्ये ११ धावा केल्या. मधल्या फळीतील शाहरुख खानने पुरती निराशा केली. शाहरुख या सामन्यात खातंदेखील खोलू शकला नाही. ओडेन स्मिथ (२) तर राहुल चहर शून्यावर बाद झाला.

तर दुसरीकडे कोलकाताच्या फलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. उमेश यादवने पहिल्याच षटकात मयंक अग्रवालला पायचित केले. भानुका राजपक्षेने कोलकातावर दाबव तयार करण्याचा प्रयत्न केला. मात्र शिवम मावीने त्याला ३१ धावांवर झेलबाद केले. शिवम मावी बाद झाल्यानंतर पंजाबचे फलंदाज एकापाठोपाठ बाद झाले. टीम साऊथीने ३ षटकांमध्ये २० धावा देत दोन बळी घेतले. तर उमेश यादवने नेत्रदीपक कामगिरी करत ४ षटकांमध्ये अवघ्या २३ धावा देत तब्बल चार बळी घेतले. शिवम मावी आणि सुनील नरेन यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

मराठीतील सर्व आयपीएल २०२२ ( Ipl ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ipl 2022 pbks vs kkr kolkata knight riders won by six wickets defeated punjab kings prd

ताज्या बातम्या