वेगवान गोलंदाज उमरान मलिकच्या (४/२८) भेदक माऱ्यानंतर फलंदाजांनी केलेल्या सांघिक कामगिरीमुळे सनरायजर्स हैदराबादने रविवारी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटच्या सामन्यात पंजाब किंग्ज संघावर सात गडी राखून मात केली. सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज उमरान मलिक आयपीएल २०२२ मध्ये आपल्या गतीने दररोज नवा इतिहास लिहित आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उमरानने रविवारी पंजाब किंग्जविरुद्धही नवा इतिहास रचला. सामन्याच्या पहिल्या डावातील २० व्या षटकात मेडन टाकणारा जम्मू-काश्मीरचा उमरान मलिक आयपीएलमधील पहिला वेगवान गोलंदाज ठरला आहे. त्यांच्याशिवाय इतर कोणत्याही दिग्गजांना ही कामगिरी करता आलेली नाही. त्याने शेवटच्या षटकात चार विकेटही घेतल्या आहेत. उमरानच्या या ऐतिहासिक कामगिरीवर काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

थरूर यांनी उमरान मलिकचे कौतुक करत म्हटले आहे की त्याला इंग्लंडला नेले पाहिजे कारण तो ब्रिटीशांना घाबरवेल. “आम्हाला त्याची भारतात लवकरात लवकर गरज आहे. किती अद्भुत प्रतिभा आहे. तो हरवण्यापूर्वी त्याला मदत करा! ग्रीनटॉप कसोटी सामन्यासाठी त्याला इंग्लंडला घेऊन जा. तो आणि बुमराह एकत्र गोलंदाजी करुन इंग्रजांना घाबरवतील!” असे शशी थरूर यांनी ट्विट करून म्हटले आहे.

याआधी आयपीएलमध्ये २०व्या षटकात मेडन टाकण्याचा विक्रम इरफान पठाण आणि जयदेव उनाकट यांच्या नावावर होता. त्यांनी सामन्याच्या दुसऱ्या डावातील शेवटची षटक मेडन टाकले होते. मात्र उमरान मलिकने पहिल्या डावात मेडन ओव्हर टाकली होती. तर या षटकात एकूण चार विकेट पडल्या, त्यापैकी तीन विकेट उमरान मलिकच्या, तर एक विकेट रन आऊट होती. यामुळे पंजाब किंग्जचा धुव्वा उडाला.

दरम्यान, नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या सामन्यात पंजाब किंग्जने दिलेले १५२ धावांचे लक्ष्य हैदराबादने १८.५ षटकांत गाठत सलग चौथ्या विजयाची नोंद केली आहे. पंजाबने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादचा कर्णधार केन विल्यम्सनला कॅगिसो रबाडाने स्वस्तात माघारी पाठवले. मात्र, त्यानंतर डावखुरा सलामीवीर अभिषेक शर्मा (२५ चेंडूंत ३१ धावा) आणि राहुल त्रिपाठी (२२ चेंडूंत ३४) यांनी ४८ धावांची भागीदारी रचत हैदराबादचा डाव सावरला. लेग-स्पिनर राहुल चहरने दोन षटकांच्या अंतराने या दोघांनाही बाद करत सामन्यात रंगत आणण्याचा प्रयत्न केला. परंतु एडिन मार्करम (२७ चेंडूंत नाबाद ४१) आणि निकोलस पूरन (३० चेंडूंत नाबाद ३५) या अनुभवी परदेशी फलंदाजांनी ७५ धावांची अभेद्य भागीदारी रचत हैदराबादला विजय मिळवून दिला.

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2022 pbks vs srh shashi tharoor reaction on the last over of umran malik abn
First published on: 18-04-2022 at 09:03 IST