scorecardresearch

इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट ; चेन्नईचा आव्हान टिकवण्यासाठी लढा ; आज पंजाबविरुद्ध सामना

चेन्नईने आतापर्यंत सातपैकी फक्त दोन सामने जिंकले आहेत, तर पंजाबच्या संघाने सातपैकी तीन विजय मिळवत किंचित सरस कामगिरी केली आहे.

मुंबई : चेन्नई सुपर किंग्जला सोमवारी इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) पंजाब किंग्जशी झुंजताना महेंद्रसिंह धोनीच्या विजयवीराच्या कामगिरीतून प्रेरणा घेत अनेक आघाडय़ांवर सुधारणा करावी लागणार आहे. कारण आणखी एका पराभवानिशी चेन्नईचे आव्हान जवळपास संपुष्टात येऊ शकते.

चेन्नईने आतापर्यंत सातपैकी फक्त दोन सामने जिंकले आहेत, तर पंजाबच्या संघाने सातपैकी तीन विजय मिळवत किंचित सरस कामगिरी केली आहे. तीन दिवसांपूर्वी झालेल्या लढतीत चेन्नईने मुंबईवर तीन गडी राखून विजय मिळवला होता. त्या सामन्यात धोनीने १३ चेंडूंत नाबाद २८ धावा काढत संघाला जिंकून दिले. अखेरच्या षटकात धोनीने एक षटकार आणि दोन चौकार मारत सामन्याचे चित्र पालटले. दुसरीकडे, पंजाबने याआधीच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सकडून नऊ गडी राखून पराभव पत्करला होता.

ब्राव्होवर भिस्त

नवा कर्णधार रवींद्र जडेजाच्या नेतृत्वाखाली गतविजेत्या चेन्नईला आपल्या दर्जाला साजेसा खेळ दाखवता आलेला नाही. जडेजाला फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीमध्ये कामगिरी उंचावता आलेली नाही. गोलंदाजी ही चेन्नईची प्रमुख समस्या आहे. परंतु मुंबईविरुद्ध मुकेश चौधरीने टिच्चून गोलंदाजी करीत तीन बळी मिळवले होते. एकूण १२ बळी खात्यावर असणाऱ्या ड्वेन ब्राव्होवर चेन्नईच्या गोलंदाजीची धुरा आहे. दीपक चहर आणि अ‍ॅडम मिल्ने यांच्यामुळे गोलंदाजीचा मारा चिंतेत असताना माहीश ठीकशानाने लक्ष वेधले आहे. फलंदाजीच्या फळीमधील युवा ऋतुराज गायकवाडला गुजरात टायटन्सविरुद्धच्या ७३ धावा वगळता गतवर्षीप्रमाणे कामगिरी उंचावता आलेली नाही. अष्टपैलू मोईन अलीकडूनही चेन्नईला मोठय़ा अपेक्षा आहेत. चेन्नईच्या फलंदाजीची भिस्त सध्या शिवम दुबे (७ सामन्यांत २३९ धावा) आणि रॉबिन उथप्पा (७ सामन्यांत २२७ धावा) यांच्यावर आहे.

बेअरस्टोऐवजी राजपक्षेला संधी?

पंजाबच्या फलंदाजीच्या फळीत यंदाच्या हंगामात सातत्याचा अभाव जाणवत आहे. लियाम लििव्हगस्टोन (२२६ धावा), शिखर धवन (२१४ धावा) या आक्रमक फलंदाजांवर त्यांची प्रामुख्याने भिस्त आहे. याशिवाय मयांक अगरवाल, शाहरूख खान यांच्यासारखे फलंदाजही त्यांच्याकडे आहेत. जॉनी बेअरस्टो चार सामन्यांत अपयशी ठरला आहे. त्यामुळे त्याच्या जागी श्रीलंकेच्या भानुका राजपक्षेला संधी मिळू शकते. पंजाबकडे भक्कम आणि वैविध्यपूर्ण गोलंदाजीचा मारा आहे. पंजाबच्या गोलंदाजीची मदार फिरकी गोलंदाज राहुल चहरवर (१० बळी) आहे. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान कॅगिसो रबाडा (६ सामन्यांत ७ बळी) आपली भूमिका चोख पार पाडतो आहे.

* वेळ : सायं. ७.३० वा. * थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी, सिलेक्ट १  (संबंधित एचडी वाहिन्यांवर)

मराठीतील सर्व आयपीएल २०२२ ( Ipl ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ipl 2022 punjab kings vs chennai super kings match prediction zws

ताज्या बातम्या