आयपीएल २०२२ च्या मोसमात राजस्थान रॉयल्सच्या जोस बटलरने सोमवारी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात हंगामातील आपले दुसरे शतक झळकावले. बटलरचे राजस्थानसाठी हे तिसरे शतक असून या फ्रँचायझीसाठी तीन शतके झळकावणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. कोलकाताविरुद्ध बटलरने ६१ चेंडूंत नऊ चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने १०३ धावांची शतकी खेळी केली.

या खेळीच्या जोरावर बटलरने आता ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आपले स्थान मजबूत केले आहे. बटलरने दीर्घकाळ ऑरेंज कॅप कायम ठेवली आहे. त्याने आता सहा सामन्यात ३७५ धावा केल्या असून या मोसमात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो अव्वल आहे.

त्याच वेळी, कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यर, ज्याने एकाच सामन्यात ८५ धावांची खेळी केली. सात सामन्यात २३६ धावा केल्याने तो ऑरेंज कॅपच्या शर्यतीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल सहा सामन्यात २३५ धावांसह तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या पाच सामन्यांत २२८ धावांसह चौथ्या आणि चेन्नई सुपर किंग्जचा शिवम दुबे पाच सामन्यांत २०७ धावांसह पाचव्या क्रमांकावर आहे.

रविवारी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध ६० धावांची शानदार खेळी करणारा पंजाब किंग्जचा फलंदाज लियाम लिव्हिंगस्टन ऑरेंज कॅपच्या शर्यतीत टॉप-५मधून बाहेर पडला आहे. लिव्हिंगस्टनच्या सहा सामन्यांत २२४ धावा आहेत. लिव्हिंग्स्टनने हैदराबादविरुद्ध ३३ चेंडूंत पाच चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने ६० धावा केल्या.

आयपीएल २०२२ पॉइण्ट टेबल

आयपीएल २०२२ गुणतालिकेत गुजरात टायटन्स सहा सामन्यांतून १० गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर राजस्थान रॉयल्स दुसऱ्या स्थानावर आणि लखनऊ सुपर जायंट्स तिसऱ्या स्थानावर आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु  चौथ्या स्थानावर आहे. सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाइट रायडर्स अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या स्थानावर आहे. पंजाब किंग्ज सातव्या, दिल्ली कॅपिटल्स आठव्या, चेन्नई सुपर किंग्स नवव्या आणि मुंबई इंडियन्स दहा संघांच्या गुणतालिकेत तळाशी आहे.

पर्पल कॅप

युझवेंद्र चहल कोलकाता नाइट रायडर्स विरुद्धच्या अप्रतिम कामगिरीनंतर सहा सामन्यांत १७ विकेट्स घेऊन आघाडीवर आहे. त्याच्यापाठोपाठ टी नटराजन (१२) दुसऱ्या, कुलदीप यादव (११) तिसऱ्या, आवेश खान (११) चौथ्या आणि वानिंदू हसरंगा (११) पाचव्या स्थानावर आहेत.