कोलकाता : वैविध्यपूर्ण गोलंदाजीचा मारा आणि दर्जेदार विजयवीरांमुळे गुजरात टायटन्सचे मंगळवारी माजी विजेत्या राजस्थान रॉयल्सविरुद्ध होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटच्या क्वालिफायर-१ सामन्यात पारडे जड मानले जात आहे.

आंतरराष्ट्रीय सामन्यांची तंदुरुस्ती सिद्ध करणाऱ्या हार्दिक पंडय़ाने ‘आयपीएल’मध्ये नवख्या गुजरातचे नेतृत्व करताना फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही आघाडय़ांवर कामगिरी करीत संघाला बाद फेरी गाठून दिली आहे. गुजरातने १४ सामन्यांपैकी १० सामने जिंकत २० गुणांनिशी साखळीत गुणतालिकेतील अग्रस्थान मिळवले, तर १४ सामन्यांपैकी ९ विजयांसह १८ गुण मिळवणारा राजस्थानचा संघ सॅमसनच्या नेतृत्वामुळे गुणतालिकेत दुसरे स्थान मिळवू शकला.

गिलला सूर गवसेल?

हार्दिकने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना यंदा ४१३ धावा काढल्या आहेत. हाणामारीच्या षटकांत राहुल तेवतिया (२१७ धावा), डेव्हिड मिलर (३८१ धावा) आणि रशीद खान (९१ धावा) यांच्यासारखे सामन्याला कलाटणी देणारे विजयवीर गुजरातकडे आहेत. शुभमन गिल (४०३ धावा) आणि वृद्धिमान साहा (३१२ धावा) या सलामीवीरांनी उत्तम योगदान दिले आहे.  गुजरातच्या गोलंदाजीची अफगाणी लेग-स्पिनर रशीद खानवर (१८ बळी) आहे. याचप्रमाणे वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीनेही टिच्चून गोलंदाजी केली आहे.

बटलरची चिंता

‘ऑरेंज कॅप’धारक जोस बटलर (६२९ धावा) आणि ‘पर्पल कॅप’धारक यजुर्वेद्र चहल (२६ बळी) ही राजस्थान संघाची प्रमुख अस्त्रे आहेत. अनुभवी रविचंद्रन अश्विनने ‘आयपीएल’च्या उत्तरार्धातील सामन्यांमध्ये आपली छाप पाडली आहे. फिरकी गोलंदाजीप्रमाणेच उपयुक्त फलंदाजीनेही सामने जिंकून देऊ शकतो, हे त्याने सिद्ध केले आहे.   याशिवाय गोलंदाजीची मदार प्रसिध कृष्णा (१५ बळी), ट्रेंट बोल्ट (१३ बळी) आणि अश्विन (११ बळी) यांच्यावर आहे.

’ वेळ : सायं. ७.३० वा.

’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी, सिलेक्ट १

..तर गुणतालिकेत सरस संघ विजेता!

 ‘आयपीएल’ संयोजकांनी बाद फेरीसाठी काही नवे नियम जाहीर केले आहेत. कोलकातामध्ये पावसाची शक्यतासुद्धा वर्तवली आहे.

 * पाऊस किंवा अन्य कोणत्याही अडथळय़ामुळे नियोजित वेळेत सामना होऊ शकला नाही, तर यंदाचा विजेता ठरवण्यासाठी सुपर ओव्हर खेळवण्यात येईल.

* अंतिम सामन्यासाठी ३० मे हा राखीव दिवस असेल. हा सामना रात्री ८ वाजता सुरू होईल.

* जर सुपर ओव्हरसुद्धा खेळवण्याची स्थिती नसेल, तर साखळी सामन्यांच्या गुणतालिकेतील सरस कामगिरी असणारा अंतिम फेरीमधील संघ विजेता ठरेल.

* राखीव दिवस कार्यक्रमपत्रिकेत नसल्यामुळे क्वालिफायर-१, एलिमिनेटर व क्वालिफायर-२ या सामन्यांनाही हा नियम लागू असेल.