नवी मुंबई : गेल्या सामन्यातील पराभव मागे सारून विजयी पुनरागमनाचे दिल्ली कॅपिटल्स संघाचे लक्ष्य असून बुधवारी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटच्या सामन्यात त्यांच्यापुढे राजस्थान रॉयल्सचे आव्हान असेल.
ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्लीचा संघ १० गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानी आहे. तर राजस्थानचे ११ सामन्यांत १४ गुण असून त्यांनी उर्वरित तीनपैकी दोन साखळी सामने जिंकल्यास त्यांचे बाद फेरीतील स्थान निश्चित होईल.
गोलंदाजांची चिंता
दिल्लीच्या गोलंदाजांनी गेल्या पाचपैकी चार सामन्यांत प्रतिस्पर्धी संघांना १८० धावांचा टप्पा ओलांडू दिला आहे. ‘चायनामन’ फिरकीपटू कुलदीप यादवने १८ बळी मिळवले असले, तरी त्याने ८.८७च्या धावगतीने धावा दिल्या आहेत. दिल्लीचे वेगवान गोलंदाजही छाप पाडू शकलेले नाहीत. दिल्लीच्या फलंदाजीची भिस्त सलामीवीर डेव्हिड वॉर्नरवर आहे.
हेटमायरची उणीव भासणार?
राजस्थानचा डावखुरा फलंदाज शिमरॉन हेटमायरने विजयवीराची भूमिका चोख बजावली आहे. मात्र, हेटमायरची पत्नी लवकरच त्यांच्या पहिल्या पाल्याला जन्म देणार असल्याने तो मायदेशी परतला आहे. फलंदाजीत जोस बटलर, यशस्वी जैस्वाल आणि कर्णधार सॅमसन हे त्रिकुट महत्त्वाची भूमिका बजावेल.
*वेळ : सायं. ७.३० वा. *थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, २, १ हिंदी