पुणे : यंदाच्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमध्ये धावा आणि शतकांचा वर्षांव करणाऱ्या राजस्थान रॉयल्सच्या जोस बटलरला रोखण्याचे प्रमुख आव्हान मंगळवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघापुढे असेल.

बटलरच्या खात्यावर सात सामन्यांत तीन शतके आणि दोन अर्धशतकांसह सर्वाधिक एकूण ४९१ धावा जमा आहेत. परंतु सलग दुसऱ्या सामन्यात पहिल्या चेंडूवर शून्यावर बाद होणाऱ्या विराट कोहलीकडे सर्वाचे लक्ष असेल. याआधीच्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादविरुद्ध बंगळूरुची तारांकित फलंदाजीची फळी फक्त ६८ धावांत कोसळली. त्यातून सावरण्याचे आव्हान बंगळूरुपुढे असेल.

बंगळूरुने आठ सामन्यांत पाच विजय मिळवले आहेत, तर राजस्थानने सात सामन्यांत पाच सामने जिंकले आहेत. मात्र याआधीचे दोन सामने जिंकल्यामुळे राजस्थानचे पारडे जड मानले जात आहे.

चहलवर मदार

बटलरला सलामीवीर देवदत्त पडिक्कल आणि कर्णधार संजू सॅमसन यांच्याकडूनही वेळोवेळी साथ मिळते आहे. शिमरॉन हेटमायरसुद्धा (२२४ धावा) सातत्याने धावा करीत संघासाठी अपेक्षित योगदान देत आहे. करुण नायर आणि रायन पराग यांनी मात्र कामगिरीत सुधारणा करायला हवी. राजस्थानच्या वैविध्यपूर्ण गोलंदाजीच्या माऱ्याची धुरा ट्रेंट बोल्टवर आहे. वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णासह यजुर्वेद्र चहल आणि रविचंद्रन अश्विन हे दाने फिरकी गोलंदाज प्रतिस्पर्धी फलंदाजांवर अंकुश ठेवण्यात पटाईत आहेत. १८ बळी खात्यावर असणारा चहल सामन्याचे चित्र पालटू शकतो. याशिवाय डावखुरा वेगवान गोलंदाज ओबेड मॅकॉय हा आणखी एक पर्याय त्यांच्याकडे आहे.

हसरंगापासून धोका

कर्णधार फॅफ डय़ूप्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक आणि शाहबाज अहमद यांच्यासारखे धडाकेबाज बंगळुरुकडे आहेत. बंगळूरुकडून डय़ूप्लेसिसने सर्वाधिक २५५ धावा केल्या आहेत, तर कार्तिकने (२१० धावा) विजयीवीराची भूमिका अनेकदा बजावली आहे. बंगळूरुकडे हाणामारीच्या षटकांत टिच्चून गोलंदाजी करणारा हर्षल पटेलसारखा वेगवान गोलंदाज आहे. मात्र त्याला मोहम्मद सिराज आणि जोश हेझलवूडकडून पुरेशा साथीची गरज आहे. यंदाच्या हंगामात ११ बळी घेणारा श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज वािनदू हसरंगाची चार षटके निर्णायक भूमिका बजावतात.

वेळ : सायं. ७.३० वा. *  थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी, सिलेक्ट १