रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात टायटन्स यांच्यात मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर यांच्यात आयपीएल २०२२ मधील ४३ वा सामना खेळला जात आहे. या सामन्यात बंगळुरूचा संघ प्रथम फलंदाजी करत होता. मैदानावर विराट कोहलीने पुन्हा एकदा दमदार खेळी करत अर्धशतक झळकावले. त्यावेळी त्याची पत्नी अनुष्का शर्मा त्याला स्टँडमध्ये चीअर करत होती.
विराट कोहलीने १३व्या षटकात मोहम्मद शमीच्या बॉलवर एक धाव देऊन अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतक पूर्ण केल्यानंतर विराटने बॅट उंचावून प्रेक्षकांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. कोहलीची ही खेळी पाहून स्टँडमध्ये उपस्थित असलेली पत्नी अनुष्का शर्मा उभी राहिली आणि जोरजोरात ओरडू लागली. अनुष्काच्या चेहऱ्यावर मोठं हसू होतं. ती टाळ्या वाजवून विराटला प्रोत्साहन देत होती.
विराट कोहलीने आपल्या इनिंगमध्ये ५८ धावा केल्या, ज्या दरम्यान त्याचा स्ट्राइक रेट १०९.४३ होता. विराटने या खेळीत सहा चौकार, एक षटकार लगावला. त्यानंतर मोहम्मद शमीने विराट कोहलीला क्लीन बोल्ड केले.
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा शनिवारी आरसीबी-गुजरात सामना पाहण्यासाठी आली होती. स्टँडमध्ये बसलेल्या अनुष्का शर्माचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी अनुष्का पांढऱ्या-हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली. विराट कोहलीने जेव्हा दमदार खेळी केली तेव्हा अनुष्काने जोरदार जल्लोष केला.
काही वेळातच अनुष्काचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. विराटचे हे अर्धशतक पाहून समालोचकांनाही आनंद झाला. समालोचकांच्या भूमिकेत असलेल्या अनुभवी हरभजन सिंग आणि इरफान पठाण यांनीही कोहलीच्या खेळीचे कौतुक केले. विराटच्या या खेळीचा भारतीय संघालाही फायदा होणार असल्याचे दोघांचे म्हणणे आहे.
दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार फॅफ डू प्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आरसीबीची पहिली विकेट लवकर पडली. डू प्लेसिस काही विशेष करू शकला नाही आणि शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर कोहलीने रजत पाटीदारसह डाव सांभाळला. दोघांनी दुसऱ्या विकेटवर ९९ धावांची भागीदारी केली. विराटने ५३ चेंडूत ५८ तर रजतने ३२ चेंडूत ५२ धावा केल्या.