आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील २० वा सामना राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात खेळवला जातोय. या सामन्यात सुरुवातीला फलंदाजीसाठी उतरलेल्या राजस्थान रॉयल्सची अतिशय दयनीय परिस्थिती झाली होती. मात्र चौथ्या विकेटसाठी उतरलेल्या शिमरोन हेटमायरने राजस्थानला तारलं असून पूर्ण संघाची जबाबदारी स्वत:च्या खांद्यावर घेत त्याने संघाला १६५ धावांपर्यंत नेऊन पोहोचवलं. विशेष म्हणजे मोठे फटके लगावत त्याने अर्धशतकी खेळी केली आहे.

हेही वाचा >>> आयपीएलमध्ये पंचांकडून चुकांवर चुका, DC vs KKR सामन्यात खेळाडू वैतागले, नेमकं काय घडलं?

नाणेफेक जिंकून लखनऊ सुपर जायंट्सने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राजस्थानचे जोस बटलर आणि देवदत्त पडिक्कल सलामीला उतरले. मात्र दोघेही चांगली कामगिरी करु शकले नाही. त्यानंतर कर्णधार संजू सॅमसन १३ धावांवर बाद झाल्यानंतर रॅसी वॅन दर डुसेन हादेखील चार धावांवर बाद झाला. त्यानंतर मात्र फलंदाजीसाठी आलेल्या हेटमायरने धडाकेबाज फलंदाजी केली. त्याने अवघ्या ३७ चेंडूमध्ये ५९ धावा केल्या. या खेळीमध्ये त्याने सहा षटकार आणि एक चौकार लगावत संघाला १६५ धावांपर्यंत जाण्यास मदत केली. विशेष म्हणजे तो शेवटच्या चेंडूपर्यंत मैदानात टीकून लखनऊच्या गोलंदाजांची धुलाई करत होता.

हेही वाचा >>> केकेआरच्या गोलंदाजांनी हात टेकले, पॉवरफुल वॉर्नरची तुफान फटकेबाजी, अर्धशतक झळकावून रचला ‘हा’ नवा विक्रम

पहिल्या दहा षटकांमध्ये राजस्थानचे चार फलंदाज बाद झाले होते. अशी दयनीय स्थिती झालेली असताना राजस्थान संघ १५० पर्यंततरी पोहोचू शकेल का ? अशी शंका उपस्थित केली जात होती. मात्र एकट्या हेटमायरने संघाची जबाबदारी घेत राजस्थानला १६५ धावसंख्येपर्यंत नेऊन ठेवले.