इंडियन प्रीमियर लीगमध्ये ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने मंगळवारी शानदार कामगिरी करताना एक मोठा विक्रम केला आहे. मंगळवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्धच्या राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या अश्विनने आपल्या संघाला मोठा विजय मिळवून दिला आहे. अश्विनने या सामन्यात चार षटके टाकली आणि अवघ्या १७ धावांत तीन मोठे बळी घेतले. यासह अश्विनने आयपीएलच्या इतिहासात १५० विकेट्स पूर्ण केल्या आहेत. ही कामगिरी करणारा अश्विन हा लीगमधील आठवा गोलंदाज ठरला आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात अश्विनने आपल्या धारदार गोलंदाजीने मधली फळी उद्ध्वस्त केली आहे. या सामन्यात अश्विनने प्रथम रजत पाटीदारला बळी बनवून क्लीन बोल्ड केले. यानंतर शाहबाज अहमद आणि सुयश प्रभुदेसाई यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. या दोन्ही फलंदाजांचे झेल रियान परागने टिपले.

आरसीबीविरुद्धच्या सामन्यानंतर अश्विनने आता आयपीएलमध्ये १५२ विकेट्स घेतल्या आहेत. अश्विनने आतापर्यंत १७५ सामने खेळले आहेत. अश्विनचा इकॉनॉमी रेट ६.९३ होता, तर त्याची सरासरी २८.०४ होती. आतापर्यंत आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम वेस्ट इंडिजच्या ड्वेन ब्राव्होच्या नावावर आहे. त्याने आतापर्यंत १५९ सामन्यात १८१ विकेट घेतल्या आहेत. तर अमित मिश्रा हा आयपीएलमध्ये सर्वाधिक १६६ विकेट घेणारा भारतीय गोलंदाज आहे.

पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात राजस्थानने बाजी मारली. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्सने फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा २९ धावांनी पराभव करून स्पर्धेतील सहावा विजय नोंदवला.

नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने आठ गडी गमावून १४४ धावा केल्या. राजस्थानकडून रियान परागने नाबाद ५६ धावा करत आयपीएलमधील आपले दुसरे अर्धशतक पूर्ण केले. रियान परागनेही चार झेल घेतले. त्याचवेळी कर्णधार संजू सॅमसनने २७ धावा केल्या. त्याच्याशिवाय बाकीचे फलंदाज विशेष काही करू शकले नाहीत. बंगळुरूकडून मोहम्मद सिराज, जोश हेझलवूड आणि वानिंदू हसंगा यांनी प्रत्येकी दोन तर हर्षल पटेलने एक गडी बाद केला.

राजस्थानने दिलेल्या ४५ धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना आरसीबीने ३७ धावांत तीन गडी गमावून खराब सुरुवात केली. कुलदीप सेनने दोन चेंडूत दोन विकेट घेत बंगळुरूला मोठा धक्का दिला आहे. कुलदीपने कर्णधार फाफ डू प्लेसिसला बाद केल्यानंतर पुढच्याच चेंडूवर ग्लेन मॅक्सवेल खाते न उघडता बाद झाला.