भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज शिखर धवन सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. धवन त्याच्या अकाऊंटवरून मजेदार व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना हसवण्यास मागेपुढे पाहत नाही. यावेळी धवनने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो पंजाब किंग्जची मालकिन प्रीती झिंटासोबत जिम करताना दिसत आहे.

शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दोघेही जिम करण्यासोबतच मस्ती करताना दिसत आहेत. शिखरने व्हिडिओमध्ये प्रसिद्ध म्युझिकचा वापर मीम म्हणून केला आहे. धवनने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये ‘एक उत्तम जिम सेशन’, असे लिहिले आहे.  सोशल मीडियावर धवन आणि झिंटाचा हा व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडत आहे.

 शिखर धवन आयपीएल २०२२ मध्ये उत्कृष्ट फॉर्ममध्ये खेळत आहे. धवनने पंजाब किंग्जसाठी ११ सामन्यांमध्ये ४२.३३ च्या सरासरीने ३८१ धावा केल्या आहेत. या डावखुऱ्या फलंदाजाने आयपीएलच्या चालू हंगामात आतापर्यंत तीन अर्धशतके झळकावली आहेत. शिखर धवन हा आयपीएल २०२२ च्या लिलावात खरेदी केलेला पहिला खेळाडू होता. धवनला पंजाब किंग्जने मेगा लिलावात ८.२५ कोटी रुपयांना विकत घेतले. आयपीएलच्या मागील तीन हंगामात धवन दिल्ली कॅपिटल्सचा भाग होता.

धवनने आतापर्यंत २०३ आयपीएल सामन्यांमध्ये ३५.२२ च्या सरासरीने ६१६५ धावा केल्या आहेत. यादरम्यान धवनने दोन शतके आणि ४७ अर्धशतके झळकावली आहेत, ज्यामुळे तो विराट कोहलीनंतर आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. विराट कोहलीच्या नावावर २१९ आयपीएल सामन्यांमध्ये ३६.३० च्या सरासरीने ६४९९ धावांचा विक्रम आहे.

पंजाब किंग्ज आठव्या क्रमांकावर

इंडियन प्रीमियर लीगच्या चालू हंगामातील पंजाब किंग्जची कामगिरी चढ-उतारांनी भरलेली आहे. मयंक अग्रवालच्या नेतृत्वाखालील संघाने आतापर्यंत ११ पैकी केवळ ५ सामने जिंकले आहेत. अशा स्थितीत पंजाबला प्लेऑफमध्ये जाण्याची शक्यता कायम राखण्यासाठी उर्वरित तीन सामने जिंकावे लागतील. पंजाब किंग्ज आता १३ मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध त्यांच्या पुढील सामन्यात भिडतील.