नवी मुंबई : वेगवान गोलंदाज उमरान मलिकच्या (४/२८) भेदक माऱ्यानंतर फलंदाजांनी केलेल्या सांघिक कामगिरीमुळे सनरायजर्स हैदराबादने रविवारी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटच्या सामन्यात पंजाब किंग्ज संघावर सात गडी राखून मात केली.

नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात पंजाबने दिलेले १५२ धावांचे लक्ष्य हैदराबादने १८.५ षटकांत गाठत सलग चौथ्या विजयाची नोंद केली. आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादचा कर्णधार केन विल्यम्सनला (३ धावा) कॅगिसो रबाडाने स्वस्तात माघारी पाठवले. मात्र, त्यानंतर डावखुरा सलामीवीर अभिषेक शर्मा (२५ चेंडूंत ३१ धावा) आणि राहुल त्रिपाठी (२२ चेंडूंत ३४) यांनी ४८ धावांची भागीदारी रचत हैदराबादचा डाव सावरला. लेग-स्पिनर राहुल चहरने दोन षटकांच्या अंतराने या दोघांनाही बाद करत सामन्यात रंगत आणण्याचा प्रयत्न केला; परंतु एडिन मार्करम (२७ चेंडूंत नाबाद ४१) आणि निकोलस पूरन (३० चेंडूंत नाबाद ३५) या अनुभवी परदेशी फलंदाजांनी ७५ धावांची अभेद्य भागीदारी रचत हैदराबादचा विजय सुनिश्चित केला.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाबचा डाव २० षटकांत १५१ धावांत संपुष्टात आला. पंजाबचे नेतृत्व करणारा शिखर धवन (८) लवकर माघारी परतला. तसेच प्रभसिमरन सिंग (१४), जॉनी बेअरस्टो (१२) आणि जितेश शर्मा (११) हेसुद्धा झटपट बाद झाल्याने पंजाबची ४ बाद ६१ अशी स्थिती होती. मात्र, लियाम लििव्हगस्टोनने आक्रमक शैलीत फलंदाजी केली. त्याने ३३ चेंडूंतच पाच चौकार आणि चार षटकारांच्या साहाय्याने ६० धावांची खेळी केली. तसेच त्याने शाहरूख खानच्या (२६) साहाय्याने पाचव्या गडय़ासाठी ७१ धावांची भर घातली. अखेर त्याला भुवनेश्वर कुमारने बाद केल्यावर पंजाबचा डाव गडगडला. उमरान मलिकने डावाच्या अखेरच्या षटकात तीन बळी घेतानाच एकही धाव दिली नाही.

संक्षिप्त धावफलक

पंजाब किंग्ज : २० षटकांत सर्वबाद १५१ (लियाम लिव्हिंगस्टोन ६०; उमरान मलिक ४/२८, भुवनेश्वर कुमार ३/२२) पराभूत वि. सनरायजर्स हैदराबाद : १८.५ षटकांत ३ बाद १५२ (एडिन मार्करम नाबाद ४१, निकोलस पूरन नाबाद ३५; राहुल चहर २/२८)

’ सामनावीर : उमरान मलिक

मयांकला दुखापत 

पंजाबचा कर्णधार मयांक अगरवालला पायाच्या दुखापतीमुळे हैदराबादविरुद्धच्या सामन्याला मुकावे लागले. त्याच्या अनुपस्थितीत शिखर धवनने पंजाबचे नेतृत्व केले. ‘‘काल सरावादरम्यान मयांकच्या पायाला दुखापत झाली. त्यामुळे तो आजच्या सामन्यात खेळू शकत नाही. मात्र, पुढील सामन्यापूर्वी तो तंदुरुस्त होणे अपेक्षित आहे,’’ असे नाणेफेकीच्या वेळी धवनने सांगितले. पंजाबचा पुढील सामना २० एप्रिलला दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणार आहे.