scorecardresearch

इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट : राजस्थान-हैदराबाद आमनेसामने

हैदराबादने यंदाच्या हंगामापूर्वी डेव्हिड वॉर्नरला संघात कायम न ठेवण्याचा निर्णय घेतला. हैदराबादला आता कर्णधार केन विल्यम्सनकडून दमदार कामगिरीची अपेक्षा आहे

पुणे : तारांकित खेळाडूंची भरणा असलेल्या राजस्थान रॉयल्स संघापुढे मंगळवारी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये सनरायजर्स हैदराबादचे आव्हान असून दोन्ही संघांचा हा यंदाच्या हंगामातील पहिलाच सामना असेल.

गेल्या वर्षी या दोन्ही संघांना चांगली कामगिरी करण्यात अपयश आले होते. राजस्थानला १४ पैकी पाच, तर हैदराबादला केवळ तीन सामने जिंकता आल्याने हे संघ गुणतालिकेत अनुक्रमे सातव्या आणि आठव्या स्थानी राहिले. मात्र यंदा दोन्ही संघांमध्ये बरेच बदल करण्यात आले असून त्यांच्या कामगिरीत सुधारणेचा मानस आहे. राजस्थानच्या संघात अनुभवी भारतीय खेळाडूंची मोठी संख्या असून गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या स्टेडियममध्ये रंगणाऱ्या या सामन्यात त्यांचेच पारडे जड मानले जात आहे. मात्र त्यांना रोखू शकतील असे खेळाडू हैदराबादच्या ताफ्यात उपलब्ध आहे.

सॅमसनवर नजर

राजस्थानने ‘आयपीएल’च्या खेळाडू लिलावात नामांकित खेळाडूंना खरेदी केले असले, तरी त्यांची प्रामुख्याने कर्णधार संजू सॅमसनवर भिस्त असेल. राजस्थानकडे सॅमसनसह जॉस बटलर, देवदत्त पडिक्कल, मुंबईकर यशस्वी जैस्वाल आणि शिमरॉन हेटमायर यांसारखे उत्कृष्ट फलंदाज आहेत. गोलंदाजीत रविचंद्रन अश्विन आणि यजुर्वेद्र चहल या अनुभवी फिरकी जोडीला न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट आणि प्रसिध कृष्णा यांची साथ लाभेल.

विल्यम्सनकडून अपेक्षा

हैदराबादने यंदाच्या हंगामापूर्वी डेव्हिड वॉर्नरला संघात कायम न ठेवण्याचा निर्णय घेतला. हैदराबादला आता कर्णधार केन विल्यम्सनकडून दमदार कामगिरीची अपेक्षा आहे. फलंदाजीत निकोलस पूरन, एडीन मार्करम आणि राहुल त्रिपाठी यांनी विल्यम्सनला साथ देणे आवश्यक आहे. गोलंदाजीत त्यांच्याकडे भुवनेश्वर कुमार आणि टी. नटराजन यांसारखे अनुभवी गोलंदाज उपलब्ध आहे. फिरकीची धुरा वॉशिंग्टन सुंदर सांभाळेल.

वेळ : सायं. ७.३० वा. ’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी (संबंधित एचडी वाहिन्यांवर)

मराठीतील सर्व आयपीएल २०२२ ( Ipl ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ipl 2022 teams of hyderabad and rajasthan will be face to face in ipl zws

ताज्या बातम्या