IPL 2023 CSK vs GT Highlights Cricket Score in Marathi: शुक्रवारी (दि. 31 मार्च) अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेचा पहिला सामना पार पडला. गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात पार पडलेल्या या सामन्यात गुजरातने शानदार विजय मिळवला. गुजरातने चेन्नईला ५ विकेट्सने पराभूत करत थाटात सुरुवात केली. गुजरातने आयपीएल इतिहासात चेन्नईला तिसऱ्यांदा सामना करताना पराभूत केले. या विजयात गोलंदाजांसोबतच फलंदाजांनीही मोलाचे योगदान दिले. पुणेकर ऋतुराज गायकवाड इंडियन प्रीमिअर लीग २०२३ स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात चांगलाच चमकला. ऋतुराजने या सामन्यात अर्धशतक करत आयपीएल २०२३ मधील पहिले-वहिले अर्धशतक झळकावण्याचा मान मिळवला. विशेष म्हणजे, अर्धशतक करत तो आयपीएलच्या हंगामात चेन्नई सुपर किंग्ससाठी पहिले अर्धशतक करणारा तिसरा फलंदाज ठरला. त्याचे शतक देखील होईल असे वाटत होते मात्र तो ५० चेंडूत ९२ धावा करून बाद झाला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर रंगलेल्या या सामन्यात गुजरात टायटन्स संघाचा हार्दिक पांड्या याने नाणेफेक जिंकून चेन्नई सुपर किंग्स संघाला फलंदाजीसाठी पाचारण केले होते. यावेळी चेन्नईची सुरुवात जरा खराब झाली. संघाला १४ धावांवर डेव्हॉन कॉनवेच्या रूपात पहिला झटका बसला. मात्र, सलामीला उतरलेल्या ऋतुराज गायकवाड याने एका बाजूने संघाची खिंड लढवत अर्धशतक पूर्ण केले. ऋतुराज गायकवाड व्यतिरिक्त इतर कोणताही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही. मोईन अलीने २३ धावांची खेळी केली, तर धोनीने अखेरच्या षटकात एक चौकार आणि एक षटकार ठोकत संघाची धावसंख्या सात बाद १७८ पर्यंत नेली. त्याने सात चेंडूत नाबाद १४ धावा केल्या. गुजरातकडून राशिद खान, अलझारी जोसेफ आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी दोन बळी घेतले. जोशुआ लिटलने एक विकेट घेत त्यांना साथ दिली. गुजरात संघात अष्टपैलू हार्दिक पांड्या व्यतिरिक्त फलंदाज शुबमन गिल उत्कृष्ट फॉर्मात आहे. फिरकीपटू राशिद खान अशा गोलंदाजांपैकी एक आहे जो आपली लय आणि सातत्य राखतो. अशा परिस्थितीत गुजरात संघाला पराभूत करणे हे सोप नव्हतं. राष्ट्रीय संघाच्या सामन्यांमुळे डेव्हिड मिलर सलामीच्या सामन्यासाठी उपलब्ध नव्हता.