Ravi Kishan Commentary Video Goes Viral: इंडियन प्रीमियर लीगच्या १६व्या हंगामाला सुरुवात झाली आहे. गतवेळच्या विजेत्या गुजरात टायटन्सने आयपीएल २०२३ मध्ये चॅम्पियनप्रमाणे सुरुवात केली आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्स (GT vs CSK) ने चेन्नई सुपर किंग्जचा ५ गडी राखून पराभव केला. यावेळी या टी२० लीगमध्ये अनेक नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. समालोचनात प्रथमच भोजपुरी वापरण्यात येत आहे. यापूर्वी आयपीएलचे समालोचन फक्त ६ भाषांमध्ये केली जात होते परंतु सध्या या लीगच्या सामन्यांची लाइव्ह कॉमेंट्री १२ भाषांमध्ये केली जात आहे. चाहत्यांना जिओ सिनेमावर वेगवेगळ्या फ्लेवर्स मिळत आहेत ज्यात भोजपुरी देखील आहे. लोक जिओ सिनेमाचा त्यांच्या मोबाईलवर मोफत आनंद घेत आहेत. ऋतुराज गायकवाड आणि शुबमन गिल यांनी आपल्या नेत्रदीपक फलंदाजीने प्रेक्षकांना भुरळ घातली, तर चाहत्यांनी स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात भोजपुरी कॉमेंट्रीचाही आनंद लुटला. प्रसिद्ध अभिनेता रवी किशन भोजपुरी समालोचन संघाचा भाग होता आणि त्याने आपल्या वन-लाइनर्सद्वारे चाहत्यांचे मनोरंजन केले. पहिल्या डावाच्या अंतिम षटकात CSK कर्णधाराने जोशुआ लिटलला जबरदस्त षटकार ठोकल्यानंतर किशनने धोनीचे कौतुक करतानाचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला. "जियो रे भोजपुरिया.," रवी किशन ऑन एअर म्हणताना ऐकले. महेंद्रसिंग धोनीची खेळी पाहून रवी किशनने त्याचे जोरदार कौतुक केले. रवी किशन म्हणाले, “एगो रांची के लइका… और विश्व में ओकर दीवानगी, वाह! हई देख धोनी के छक्का. जियऽ जवान जियऽ…लह गइल-लह गइल.” रवी किशनने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर कॉमेंट्री करतानाचे त्यांचे तीन फोटो पोस्ट केले आहेत, ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “भारतात एक सण म्हणून साजरा केला जाणारा क्रिकेट, यावेळी त्याचा आनंद द्विगुणित होणार आहे. काहे से हम आप लोगन के खातिर पूर मैच के विवरण भोजपुरी में सुनाए आवत बाटी, बनल रहीं हमरे संगे और आनंद लेई भोजपुरी मिठास में बैट बाल के खेला के.” हेही वाचा: IPL 2023: ‘ई साला कप नहीं!’ भर कार्यक्रमात भलतच बोलून बसला फाफ डू प्लेसिस, कोहलीला हसू अनावर, Video व्हायरल भोजपुरीमध्ये आयपीएलची कॉमेंट्री पाहून सोशल मीडियावर लोक खूप खूश आहेत. एका चाहत्याने लिहिले: ‘गर्दा उद गेल बा… भोजपुरी समालोचनात… बिहारचा लाला चिरंजीव हो.’ जिओ सिनेमाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर लिहिले, ‘जिंदगी मस्त बा… #IPLonJioCinema देखने का घमंड बा!’ सामन्याबद्दल बोलताना चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने ९२ धावांची खेळी केली तर गुजरातचा सलामीवीर शुबमन गिलने ६३ धावा केल्या. गुजरातने सीएसकेवर सलग तिसरा विजय नोंदवला. याआधी त्यांनी गेल्या हंगामात चेन्नईला दोन सामन्यात पराभूत केले होते.