scorecardresearch

IPL 2023, RCB: कोहलीच्या बंगळुरूला मोठा झटका, पहिल्या सात सामन्यांतून ‘हा’ स्टार गोलंदाज बाहेर, जाणून घ्या

विल जॅक्स दुखापतीमुळे आधीच आयपीएलमधून बाहेर पडला आहे. त्याचवेळी आता संघाला आणखी एक धक्का बसू शकतो. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज अद्याप दुखापतीतून सावरलेला नाही. अशा स्थितीत तो आरसीबीचे किमान पहिल्या सात सामने खेळू शकणार नाही.

IPL 2023, RCB: Major blow to Kohli's Bangalore, Josh Hazlewood star bowler out of first seven matches Know
सौजन्य- IPL २०२३ (ट्विटर)

आयपीएल २०२३ला सुरूवात होणार असून या ५२ दिवसात एकूण ७४ सामने खेळवले जाणार आहेत. आयपीएलचा १६वा हंगाम होम आणि अवे फॉरमॅटमध्ये परतणार आहे. यावर्षी सर्व संघ साखळी फेरीत सात होम ग्राऊंडवर आणि सात बाहेर असे सामने खेळणार आहेत. फॅफ डुप्लेसिसच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ आपल्या घरच्या मैदानावर खूप मजबूत मानला जातो. मात्र, यंदा संघ अनेक खेळाडूंच्या दुखापतींशी झुंजत आहे.

विल जॅक्स दुखापतीमुळे आधीच आयपीएलमधून बाहेर पडला आहे. त्याचवेळी आता संघाला आणखी एक धक्का बसू शकतो. वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड अद्याप दुखापतीतून सावरलेला नाही. अशा स्थितीत तो आरसीबीच्या किमान पहिल्या सात सामन्यांतून बाहेर राहू शकतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तो संपूर्ण हंगामासाठी बाहेर असण्याची शक्यता आहे. याशिवाय ग्लेन मॅक्सवेलही पहिल्या सामन्यात खेळणार का? याबाबत साशंकता आहे.

हेही वाचा: IPL 2023: IPLचे तिकीट सामन्यांच्या आवाक्यात आहेत? कुठे, कधी आणि कशी खरेदी करायची; जाणून घ्या फक्त एका क्लिकवर

गेल्या वर्षी मॅक्सवेलचा पायाचा स्नायू दुखावला होता. त्यानंतर तो एकही सामना खेळू शकला नाही. अलीकडेच मॅक्सवेलने भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत पुनरागमन केले, पण विशेष काही फारशी चांगली कामगिरी करू शकला नाही. आरसीबी त्यांचा पहिला सामना २ एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध बंगळुरू येथे खेळणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पायाला फ्रॅक्चर झाल्यानंतर मॅक्सवेल पूर्णपणे बरा झालेला नाही. अशा स्थितीत विराट कोहलीवर अधिक जबाबदारी असणार आहे.

जॉश हेझलवूड १४ एप्रिलपर्यंत विश्रांती घेणार आहे. त्यानंतरची पुढील परिस्थिती पाहून आगामी सामन्यांत खेळणार की नाही याबाबत निर्णय होईल. हेजलवूड दुखापतीमुळे भारताविरुद्धच्या कसोटी आणि त्यानंतर वन डे मालिकेलाही मुकला आहे. हेझलवूडला आयपीएलच्या माध्यमातून अॅशेसची तयारी करण्याची आशा आहे. तो म्हणाला, “टी२० साठी तुम्हाला जास्त कामाचा बोजा लागत नाही. फक्त मूलभूत गोष्टींवर लक्ष केंद्रित करायचे असते. मला कदाचित फक्त एक किंवा दोन सत्र पूर्ण करावे लागतील त्यानंतर मी माझी लय पकडू शकेन.”

हेही वाचा: IPL 2023 Opening Ceremony: तब्बल चार वर्षांनी रंगणार उद्घाटन सोहळा! रश्मिका मंदाना, तमन्नासह हे तारे-तारका दाखवणार जलवा

पुढे बोलताना हेजलवूड म्हणाला, “टी२० हा कसोटी आणि अगदी एकदिवसीय क्रिकेटपेक्षा खूप वेगळा आहे. लहान फॉरमॅटमध्ये, तुमची लय शोधण्यासाठी तुम्हाला फक्त २० चेंडू लागतील.” ३२ वर्षीय हेझलवूड भारतात रवाना होण्यापूर्वी क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून वैद्यकीय मंजुरीची प्रतीक्षा करत आहे. हेझलवूड म्हणाला, “अॅशेसच्या तयारीसाठी मला गोलंदाजी करावी लागते, त्यामुळे आयपीएलमध्ये खेळणे माझ्यासाठी फायदेशीर ठरू शकते. हेझलवूडने गेल्या वर्षी आयपीएलमध्ये १२ सामन्यांत २० विकेट घेतल्या होत्या. त्याचा फायदा त्याला टी२० वर्ल्ड कपमध्ये झाला होता.”

मराठीतील सर्व आयपीएल २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-03-2023 at 16:13 IST

संबंधित बातम्या