scorecardresearch

IPL 2023: मुंबई इंडियन्समध्ये पोलार्ड-हार्दिकची जागा कोण घेणार? हरभजन सिंगने दिली ‘या’ दोन खेळाडूंची नावे

सर्वाधिक पाच वेळा ही स्पर्धा जिंकणारा मुंबई इंडियन्सचा संघ सध्या बदलाच्या टप्प्यातून जात आहे. त्याची मिडल ऑर्डर नवीन आहे. हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्याच्या बाहेर पडल्यानंतर किरॉन पोलार्डनेही निवृत्ती घेतली.

IPL 2023: Who will replace Pollard and Hardik in Mumbai Indians Harbhajan Singh named these two players
सौजन्य- (ट्विटर)

इंडियन प्रीमियर लीगचा (IPL 2023) १६वा हंगाम ३१ मार्चपासून सुरू होत आहे. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात चार वेळा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्जचा सामना गतविजेत्या गुजरात टायटन्सशी होणार आहे. युवा स्टार हार्दिक पांड्या पहिल्याच सामन्यात अनुभवी महेंद्रसिंग धोनीच्या विरोधात असेल. सर्वाधिक पाच वेळा ही स्पर्धा जिंकणारा मुंबई इंडियन्सचा संघ सध्या बदलाच्या म्हणजेच संक्रमणाच्या टप्प्यातून जात आहे. त्याची मिडल ऑर्डर नवीन आहे. हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्याच्या बाहेर पडल्यानंतर किरॉन पोलार्डनेही निवृत्ती घेतली. चाहत्यांच्या मनात नेहमीच एक प्रश्न असतो की या संघात हार्दिक आणि पोलार्डची जागा कोण घेणार? यावर भारताचा माजी यशस्वी फिरकीपटू हरभजन सिंगने दोन खेळाडूंची नावे सुचवली आहेत.

२०२२चा हंगाम सुरू होण्यापूर्वी हार्दिक पांड्याने संघापासून फारकत घेतली. त्याला मुंबई इंडियन्सने सोडले. तो गुजरात टायटन्सचा कर्णधार झाला. त्याने आपल्या नेतृत्वाखाली गुजरातला शेवटच्या वेळी चॅम्पियन बनवले. दुसरीकडे, पोलार्डने नुकतीच आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केली. मुंबई इंडियन्सकडून दीर्घकाळ खेळणाऱ्या हरभजन सिंगने या दोन दिग्गज खेळाडूंच्या जागी दोन नवीन खेळाडूंची नावे सुचवली आहेत.

हेही वाचा: IPL 2023: “आयपीएलपेक्षा भारताला अधिक…”, सुनील गावसकरांचा टीम इंडियाला सल्ला; ‘या’ चुकांवरही ठेवलं बोट!

आगामी हंगामात मुंबई इंडियन्सला यश मिळवायचे असेल तर टीम डेव्हिड आणि कॅमेरून ग्रीन यांना किरॉन पोलार्ड आणि हार्दिक पांड्याची जागा घ्यावी लागेल, असे मत भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग याने व्यक्त केले. स्पर्धेची सकारात्मक सुरुवात ही यशाची गुरुकिल्ली असल्याचे हरभजनचे मत आहे. त्याने स्टार स्पोर्ट्सला सांगितले, “टिम डेव्हिड आणि कॅमेरून ग्रीन यशस्वी होऊ शकतात. जर पोलार्ड जे करत होता ते टिम डेव्हिड करू शकतो आणि हार्दिक जे करत होता ते ग्रीन करू शकतो.

हरभजन म्हणाला, “टिम डेव्हिड आणि ग्रीनमध्ये क्षमता आहे, पण आयपीएल ही अशी स्पर्धा आहे, जर तुम्ही पहिल्या दिवसापासून चांगली कामगिरी करण्यास सुरुवात केली तर तुमचा हंगाम चांगला जाईल. नंतर ते खूप कठीण होऊन बसते.” मुंबई इंडियन्स संघ गेल्या मोसमात पॉइंट टेबलच्या तळाशी १०व्या स्थानावर होता. यावेळी त्यांचा पहिला सामना २ एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होणार आहे.

हेही वाचा: IND vs AUS: कांगारूंनी रोखला टीम इंडियाचा विजयरथ! मायदेशातील पराभवावर दिग्गजांनी डागली तोफ, स्मिथचे केले कौतुक

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला विक्रम

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात बुधवारी (दि. २२ मार्च) तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात कर्णधार रोहित शर्मा चमकला. रोहितने या सामन्यात छोटेखाणी खेळी केली, पण त्या खेळीतही त्याने मोठा पराक्रम केला. तो अशी कामगिरी करणारा आठवा भारतीय खेळाडू बनला. या सामन्यात रोहित शर्माच्या नावावर आशियात खेळताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०००० धावा करण्याचा विक्रम नोंदवला गेला. सामन्यात फलंदाजीला उतरण्यापूर्वी रोहितच्या नावावर ९९९६ धावा होत्या. मात्र, त्याने ४ धावा करताच त्याच्या १०००० धावा पूर्ण झाल्या. रोहितच्या ३० धावांमुळे आता त्याच्या आशियामध्ये एकूण १००२६ आंतरराष्ट्रीय धावा झाल्या आहेत.

मराठीतील सर्व आयपीएल २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-03-2023 at 15:23 IST

संबंधित बातम्या