चेन्नई : चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स सलग दुसऱ्यांदा इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या सामन्यात आमनेसामने येणार आहे. आज, मंगळवारी होणारा हा सामना चेन्नईतील एमए चिदम्बरम स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

चेन्नई आणि लखनऊ हे संघ गेल्याच आठवडयात लखनऊमध्ये एकमेकांसमोर आले होते. कर्णधार केएल राहुल आणि क्विंटन डिकॉक यांच्यात पहिल्या गडयासाठी झालेल्या विक्रमी भागीदारीच्या जोरावर लखनऊने विजय मिळवला होता. आता या पराभवाची परतफेड करण्याचा चेन्नईचा प्रयत्न असेल. दोन्ही संघांचे सात सामन्यांनंतर आठ गुण झाले आहेत. चेन्नईला आता पुढील तीन सामने घरच्या मैदानावर खेळण्याची संधी मिळणार आहे. हे सामने जिंकत ‘प्ले-ऑफ’ प्रवेशासाठी आपले दावेदारी भक्कम करण्याचा चेन्नईचा प्रयत्न राहील.

हेही वाचा >>> IPL 2024: राजस्थान ‘यशस्वी’; जैस्वालची शतकी खेळी, ५ विकेट्ससह संदीप शर्माची दमदार साथ

चेन्नईसाठी कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि शिवम दुबे यांनी फलंदाजीत चमक दाखवली आहे. सलामीवीर रचिन रवींद्रची लय संघासाठी चिंतेचा विषय आहे. रवींद्र जडेजाने लखनऊविरुद्ध गेल्या सामन्यात अर्धशतक झळकावले होते. मोईन अली आणि महेंद्रसिंह धोनीने अखेरच्या षटकांत फटकेबाजी केली होती. गोलंदाजीत मथीश पथिरानाने चांगली कामगिरी केली आहे.

लखनऊसाठी राहुल आणि डिकॉक लयीत आहेत. निकोलस पूरनकडूनही लखनऊला अपेक्षा असतील. लखनऊचा युवा वेगवान गोलंदाज मयांक यादवच्या पुनरागमनाची शक्यता आहे. त्याला मोहसीन खान आणि यश ठाकूरकडून चांगल्या सहकार्याची अपेक्षा असेल.

* वेळ : सायं. ७.३० वा. * थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी, जिओ सिनेमा अ‍ॅप