आयपीएल २०२४ मध्ये २१ एप्रिलला वरिवारी दोन सामने खेळवण्यात आले होते. केकेआर विरूद्ध आरसीबी आणि दुसरा सामना पंजाब विरूद्ध गुजरात यांच्यात झाला. या दोन्ही सामन्यांमध्ये आरसीबी आणि पंजाब किंग्सला पराभव पत्करावा लागला आहे. पण या पराभवानंतर दोन्ही संघांच्या कर्णधारांना वेगवेगळ्या कारणांसाठी मोठा दंड ठोठावण्यात आला आहे. आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिसला लाखोंचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर सॅम करनला मानधनाच्या ५० टक्के दंड आकारण्यात आला पण काय आहे कारण वाचा.

डु प्लेसिसला स्लो ओव्हर रेटसाठी १२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध आरसीबीच्या एका धावेने झालेल्या पराभवात डू प्लेसिसच्या संघाने षटकांची गती राखल्यामुळे हा दंड ठोठोवण्यात आला. तसेच, संघातील सदस्यांना ६ लाख किंवा त्यांच्या मॅच फीच्या २५ टक्के दंड आकारला जाईल. तिसऱ्यांदा सारखीच चूक झाल्यास एका सामन्याची बंदीही घालण्यात येईल. डु प्लेसिसच्या आधी केएल राहुल, ऋतुराज गायकवाड, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, शुभमन गिल आणि संजू सॅमसन यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचा-IPL 2024: स्वप्नातही आरसीबीला हरवण्याचा विचार करणाऱ्या गंभीरनेच केलं विराटच्या संघाचं कौतुक, पाहा नेमकं काय म्हणाला

दुसरीकडे पंजाब किंग्जचा कर्णधार सॅम करनलाही दंड ठोठावण्यात आला आहे. गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात आयपीएल आचारसंहितेच्या कलम २.८ अंतर्गत लेव्हल १ च्या गुन्ह्यासाठी करनला त्याच्या मॅच फीच्या ५० टक्के दंड ठोठावण्यात आला. हा गुन्हा पंचांच्या निर्णयावर असमाधान व्यक्त करण्याच्या संदर्भात आहे. आयपीएल निवेदनात म्हटले आहे की,’करनने आयपीएल आचारसंहितेच्या कलम २.८ अंतर्गत लेव्हल १ चा गुन्हा केला आहे. त्याने त्याचा गुन्हा आणि शिक्षा मान्य केली आहे.’

आरसीबीप्रमाणे पंजाब किंग्जची स्थितीही विशेष नाही. पंजाब किंग्जला गुजरात टायटन्सकडून तीन गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. पंजाब किंग्जचा आठ सामन्यांमधील हा सहावा पराभव असून ते गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहेत. शिखर धवनला दुखापत झाल्यामुळे सॅम करन सध्या पंजाब किंग्जची धुरा सांभाळत आहे.