RCB vs CSK Virat Kohli:  आयपीएल २०२४ चा ६८ वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्जमध्ये खेळवला जाणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. विशेषत: चेन्नई सुपर किंग्जसाठी; कारण हा सामना जिंकल्यास चेन्नई सुपर किंग्ज थेट प्लेऑफमध्ये पोहोचेल. या सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) चा स्टार खेळाडू विराट कोहलीचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओमधील मुलाखतीत विराटने त्याच्या आयुष्यातील अनेक गोष्टींना उजाळा दिलाय. यावेळी विराटने अशीच एक इच्छा व्यक्त केली आहे, जी त्याला मनापासून पूर्ण करायची आहे. “बर्‍याच कालावधीत मी भारतातील रस्त्यावरून फिरू शकलो नाही, असे म्हणत, तो शेवटचे कधी रस्त्यावर फिरलो हे आठवत नसल्याचे” त्याने म्हटले आहे.

विराट कोहलीने नेमकी कोणती इच्छा व्यक्त केली?

विराट कोहलीने स्टार स्पोर्ट्सला एक मुलाखत दिली, ज्याचा व्हिडीओ त्यांनी इन्स्टाग्रामवर अपलोड केलाय. या व्हिडीओमध्ये विराट कोहली म्हणतोय की, “मी कुठल्याही वाहनाने किंवा स्कूटीवरून नाही, तर मी चालत जाईन. मी भारतात अजून एकदाही कधी चालत फिरलो नाही, या गोष्टीचे मला खूप वाईट वाटते आणि हीच गोष्ट मी आज खूप मिस करतो आहे.”

“माझ्या लहानपणी पश्चिम दिल्लीतील ज्वाला हेरी हे आमचे शॉपिंग मार्केट होते. मी तिथे नेहमी जायचो. बाहेर माझी स्कूटी उभी करून तिथे फिरायचो, कधी कधी जीन्स खरेदी करण्यासाठी म्हणून जायचो. या ठिकाणी तिबेटी मार्केट आहे, जिथे उत्तम जीन्स मिळतात. मी तिथून बऱ्याच गोष्टी विकत घेतल्या आहेत”, असही विराट म्हणाला.

.”..तर मी मनापासून फक्त फिरेन.”

कोहली पुढे म्हणाला की, “मी खरोखरच या गोष्टी मिस करतोय. जर कोणी मला वेळ दिला ना, तर मी मनापासून फक्त फिरेन. रस्त्याने चालण्याचा तो एक वेगळाच आनंद असतो; वाटेल त्या दुकानात जा, काहीही खा किंवा खरेदी करा. शेवटच्या वेळी मी तिथल्या रस्त्यावर कधी चाललो तेही मला आठवत नाही.”

विराट कोहलीने यात पश्चिम दिल्लीतील स्थानिक मार्केटमध्ये फिरण्याच्या, शॉपिंगच्या आणि रस्त्यावरून चालण्याच्या आठवणींना उजाळा दिला. कोहलीला व्यस्त वेळापत्रक आणि प्रचंड लोकप्रियता या गोष्टींमुळे जीवनातील इतक्या साध्या गोष्टींचा आनंद घेणे कठीण झाले आहे.

विराट कोहलीला कशाचीही कमतरता नाही. करोडोंच्या संपत्तीचा मालक असलेल्या विराटकडे आलिशान गाड्या आहेत. कोहली त्याला हवे ते विकत घेऊ शकतो, त्याला हवे ते करू शकतो. मात्र, हा स्टार फलंदाज भारतातील रस्त्यावरून फक्त फिरण्याची त्याची एक इच्छा पूर्ण करू शकत नाही.

“सिक्स मारेल या भीतीने बिचारा…” अर्जुन तेंडुलकरच्या ‘त्या’ कृतीवर भन्नाट मीम्स व्हायरल; नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

कोहलीची फॅन फॉलोइंग खूप मोठी आहे. त्याचे चाहते सर्वत्र आहेत. त्याचे इन्स्टाग्रामवर २४६ दशलक्ष फॉलोअर्स आणि ट्विटरवर ५४.९ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. कोहलीची प्रसिद्धी पाहता खरोखरच त्याने सुरक्षेशिवाय रस्त्यावर मोकळेपणाने चालणे जवळजवळ अशक्य झाले आहे. कोहली कुठेही दिसताच चाहत्यांचा मोठा गराडा त्याच्या भोवती जमा होतो. त्याच्याबरोबर एक फोटो काढण्यासाठी चाहते फार उत्सुक असतात.

विराट कोहली सध्या आयपीएल २०२४ मध्ये खेळत असून तो जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. या फलंदाजाकडून जूनमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकात महत्त्वाची भूमिका बजावत संघाला विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल, अशी अपेक्षा आहे.