हैदराबादचे बडे बडे फलंदाज जिथे फेल झाले तिथे २० वर्षीय खेळाडूने ६४ धावांची वादळी खेळी केली. अनेकांसाठी अपरिचित असलेल्या नितीश रेड्डीने ३७ चेंडूत ६४ धावांची तुफानी खेळी करत संघाला सामन्यात परत आणले आणि मोठी धावसंख्या उभारण्यात मोठी भूमिका बजावली. या खेळीत त्याने चार चौकार आणि पाच गगनचुंबी षटकार ठोकले. चौथ्या क्रमांकावर आलेल्या नितीश रेड्डीचे हे आयपीएल पहिलेच अर्धशतक होते.

नितीशला अब्दुब समदने १२ चेंडूत २५ धावा करत चांगली साथ दिली. सहाव्या विकेटसाठी दोघांमध्ये अवघ्या २० चेंडूत ५० धावांची भागीदारी झाली. त्यामुळे हैदराबादला निर्धारित २० षटकात ९ बाद १८२ धावा करता आल्या.

कोण आहे हा नितीश रेड्डी?

नितीशकुमार रेड्डी हा अवघ्या २० वर्षांचा अनकॅप्ड खेळाडू आहे, जो आंध्राकडून देशांतर्गत सामन्यांमध्ये खेळतो. २६ मे २००३ साली जन्मलेला नितीश पुढील महिन्यात २१ वर्षांचा होणार आहे. नितीश तडाखेबंद खेळी खेळण्यासाठी ओळखला जातो. तो वेगवान गोलंदाज असून विकेटकीपिंगही करतो. त्याने आंध्र प्रदेशसाठी १७ प्रथम-श्रेणी सामने खेळले असून एक शतक आणि दोन अर्धशतकांसह २०.९६ च्या सरासरीने ५६६ धावा केल्या आहेत. या सामन्यांमध्ये त्याने २२.९६ च्या सरासरीने ५२ विकेट्सही घेतल्या आहेत.

दुसऱ्याच सामन्यात चमकला नितीश

यंदाच्या आयपीएल मोसमातील हा त्याचा दुसरा सामना होता. यापूर्वी, ५ एप्रिलला चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात त्याने केवळ ८ चेंडूत नाबाद १४ धावा केल्या आणि ११ चेंडू शिल्लक ठेवत संघाला विजय मिळवून दिला. आयपीएल २०२३ मध्ये त्याला फक्त दोन सामने खेळण्याची संधी मिळाली, ज्यामध्ये त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही. संघाने त्याचा गोलंदाज म्हणून वापर केला, पण त्याला एकही विकेट मिळवता आली नाही.

नितीशच्या वडिलांनी आपल्या मुलाला क्रिकेटर बनवण्यासाठी नोकरी सोडून नितीशच्या कारकिर्दीला आकार दिला. आता त्यांच्या या मेहनतीचं फळ मिळत आहे. भारताचा अनुभवी कसोटी फलंदाज आणि आंध्र प्रदेशचा माजी कर्णधार हनुमा विहारी याने सोशल मीडियावर नितीशच्या खेळीचे कौतुक केले. या अष्टपैलू खेळाडूच्या टी-२० कारकिर्दीतील ही सर्वोच्च धावसंख्या आहे. आयपीएल २०२३ पूर्वी सनरायझर्स हैदराबादने त्याला २० लाखांच्या मूळ किमतीत खरेदी केले होते.