चेन्नई : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील सर्वांत लोकप्रिय संघांमध्ये गणना होणारे चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु हे दाक्षिणात्य संघ आज, शुक्रवारी आमनेसामने येणार आहेत. या लढतीत बंगळूरुचा विराट कोहली आणि चेन्नईचा महेंद्रसिंह धोनी या तारांकितांवर चाहत्यांचे विशेष लक्ष असेल.

एकीकडे चेन्नईने पाच वेळा ‘आयपीएल’चे जेतेपद पटकावले आहे, तर दुसरीकडे बंगळूरुची पाटी कोरीच आहे. जेतेपदाच्या बाबतीत हे दोन संघ एकमेकांपासून बरेच दूर असले, तरी लोकप्रियतेत या संघांची निश्चितपणे तुलना केली जाऊ शकते. एका संघात कोहली आणि दुसऱ्या संघात धोनी असल्याने चाहत्यांमध्ये या सामन्याविषयी प्रचंड उत्सुकता असते. बंगळूरुने गतविजेत्या कोलकाता नाइट रायडर्सला, तर चेन्नईने पारंपरिक प्रतिस्पर्धी मुंबई इंडियन्सला नमवत यंदाच्या हंगामाची यशस्वी सुरुवात केली. त्यामुळे दोन्ही संघ विजयरथ कायम राखण्याचे ध्येय बाळगूनच आज मैदानात उतरतील.

एमए चिदम्बरम अर्थात चेपॉक स्टेडियम या घरच्या मैदानावर चेन्नईला पराभूत करणे हे अन्य संघांसाठी मोठे आव्हान ठरते. याचा प्रत्यय बंगळूरु संघाला वारंवार आला आहे. बंगळूरुच्या संघाने चेपॉकवर केवळ एकदा चेन्नईला पराभूत केले आहे. त्यांनी हा विजय २००८ मध्ये म्हणजेच ‘आयपीएल’च्या पहिल्या हंगामात मिळवला होता. त्यानंतर मात्र चेन्नईच्या संघाने बंगळूरुवर वर्चस्व गाजवले आहे. आता बंगळूरुचा संघ चेपॉकवरील १७ वर्षांपासूनची विजयाची प्रतीक्षा संपविणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

● वेळ : सायं. ७.३० वा.

● थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी, जिओहॉटस्टार अॅप.

कोहलीसह फलंदाजांचा कस

चेन्नई येथील खेळपट्टी फिरकी अनुकूल असणार हे निश्चित आहे. चेन्नईच्या संघात रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, नूर अहमद यांसारखे गुणवान फिरकीपटू असल्याने त्यांच्याविरुद्ध खेळताना विराट कोहलीसह बंगळूरुच्या सर्वच फलंदाजांचा कस लागेल. यंदा सलामीच्या लढतीत बंगळूरुने गतविजेत्या कोलकाताला पराभूत केले होते. कोहली आणि फिल सॉल्ट या सलामीवीरांना आक्रमक अर्धशतके साकारत बंगळूरुच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली होती. चेन्नईचे फिरकीपटू गोलंदाजीला येण्यापूर्वी या दोघांनी ‘पॉवर-प्ले’मध्ये फटकेबाजी करणे आवश्यक आहे. मधल्या फळीची भिस्त कर्णधार रजत पाटीदार, लियाम लिव्हिंगस्टोन आणि टीम डेव्हिड यांच्यावर असेल. तसेच कोलकाताविरुद्ध चमक दाखविणारा डावखुरा फिरकीपटू कृणाल पंड्या कामगिरीत सातत्य राखण्यास उत्सुक असेल.

धोनीला संधी मिळणार?

चेन्नई सुपर किंग्जच्या सामन्यात धोनीच्या कामगिरीकडेच चाहत्यांचे लक्ष असते. गेल्या काही हंगामांपासून धोनी सातव्या किंवा त्याहून खालच्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी येत आहे. सलामीच्या लढतीत मुंबईविरुद्ध तो आठव्या क्रमांकावर आला. त्याने केवळ दोन चेंडू खेळले. आता बंगळूरुविरुद्ध तो अधिक चेंडू खेळणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. चेन्नईच्या फलंदाजीची मदार कर्णधार ऋतुराज गायकवाड, रचिन रवींद्र आणि शिवम दुबे यांच्यावर असेल. जडेजा, अश्विन, सॅम करन यांसारख्या अष्टपैलूंचा समावेश ही चेन्नईची ताकद आहे. मुंबईविरुद्ध अफगाण नूरने चार बळी मिळवत आपली गुणवत्ता सिद्ध केली होती. या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा त्याचा मानस असेल.