Preity Zinta Emotional After IPL 2025 Final: मंगळवारी रात्री आरसीबीनं आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यात पंजाब किंग्जचा पराभव करून विजेतेपदावर पहिल्यांदाच नाव कोरलं. बंगळुरूनं तब्बल १७ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आयपीएल ट्रॉफी जिंकल्यामुळे सोशल मीडियापासून सर्वत्र आरसीबीचा विजय आणि विराट कोहलीचे अश्रू अनावर झालेले व्हिडीओ याचीच चर्चा पाहायला मिळत आहे. मात्र, एकीकडे सगळेच आरसीबीच्या जेतेपदाची चर्चा करत असताना दुसरीकडे नेटिझन्सनं पराभवानंतर डोळ्यांत वेदना घेऊन भावनांना आवर घालत फिरणाऱ्या प्रीती झिंटाचीही आठवण करून दिली आहे.
आरसीबी व विराट कोहलीनं पहिल्यांदाच विजेतेपद पटकावल्यामुळे बंगळुरूला मोठ्या प्रमाणावर समर्थन मिळताना पाहायला मिळालं. पण PBKS संघदेखील गेल्या १८ पर्वांमध्ये एकदाही आयपीएल ट्रॉफी जिंकू शकलेला नाही. त्यामुळे आरसीबीप्रमाणेच पंजाब संघही आयपीएल ट्रॉफीची तितक्याच आतुरतेनं प्रतीक्षा करत होता. मात्र, शेवटच्या सामन्यात आरसीबीनं सरस खेळ करत पंजाबला नमवलं आणि आयपीएलचं जेतेपद आपल्या नावावर केलं.
प्रीती झिंटाचे फोटो व्हायरल!
विजयानंतर मैदानावरच ओक्साबोक्शी रडणाऱ्या विराट कोहलीचे फोटो जसे व्हायरल होत आहेत, तसेच प्रयत्नपूर्वक आपल्या भावना आवरून धरत मैदानावर आपल्या संघाच्या अर्थात पंजाब किंग्जच्या खेळाडूंना धीर देतानाचे प्रीती झिंटाचेही फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये प्रीती झिंटा पंजाबी ड्रेसमध्ये दिसत आहे. सामना संपल्यानंतर प्रीती झिंटा मैदानावर आली आणि तिनं कर्णधार श्रेयस अय्यरसह पंजाबच्या सर्वच खेळाडूंना धीर दिला. प्रीती झिंटाच्या या कृतीचंही नेटिझन्सकडून कौतुक केलं जात आहे.
काही नेटिझन्सनं प्रीती झिंटाच्या अशाच भावनिक झालेल्या २०१४ आयपीएल फायनलमधील फोटोंची आठवण करून दिली.
काहींनी प्रीती झिंटा एक अतिशय चांगली संघमालक असून कोणत्याही परिस्थितीत संघासोबत उभी राहत असल्याचं नमूद केलं आहे.
एका युजरनं प्रीती झिंटादेखील गेल्या १८ वर्षांपासून आयपीएल विजेतेपदाची वाट पाहात असल्याची आठवण करून दिली.
काही युजर्सनं प्रीती झिंटाला लवकरच तूही आयपीएल ट्रॉफी हातात घेतलेली दिसशील, पुढच्या वर्षी पंजाब विजयी होईल अशी खात्री आहे, अशा शुभेच्छाही प्रीतीला दिल्या आहेत.
RCB पहिल्यांदाच विजयी!
मंगळवारी रात्री कर्नाटकमध्ये अक्षरश: दिवाळी साजरी झाली. आयपीएलच्या अंतिम सामन्यात कधीही विजेतेपद न मिळवलेले दोन संघ खेळत होते. त्यामुळे यंदा आयपीएलला नवा विजेता मिळणार यावर शिक्कामोर्तब झालं होतं. पंजाब किंग्जनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. आरसीबी २०० धावांचा टप्पा सहज पार करेल असं वाटत असतानाच शेवटच्या तीन षटकांत पंजाबच्या गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी केली आणि आरसीबीला १९० धावांवर रोखण्यात PBKS ला यश आलं.
आयपीएलच्या विजेतेपदासाठी १९१ धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या पंजाब किंग्जची सुरुवात चांगली झाली. पाचव्या षटकापर्यंत जवळपास १० च्या सरासरीने दोन्ही सलामीवीरांनी धावा कुटल्या. पण पाचव्या षटकात भरवशाच्या जॉश हेझलवूडनं आरसीबीला पहिली विकेट मिळवून दिली. फिल सॉल्टनं प्रियांश आर्याचा सीमारेषेवर अफलातून झेल टिपला आणि पंजाबच्या घसरगुंडीला सुरुवात झाली. तरीदेखील पंजाबनं हिकमती खेळी करत शेवटच्या षटकापर्यंत सामना नेला. शेवटच्या षटकात २९ धावांची गरज असताना हेझलवूडकडे कर्णधार रजत पाटीदारनं चेंडू सोपवला. पहिले दोन चेंडू निर्धाव गेल्यानंतर पुढे शशांकनं तीन षटकार आणि एक चौकार लगावला. पण तोपर्यंत आरसीबीच्या विजयावर शिक्कामोर्तब झालं होतं. आरसीबीनं ६ धावांनी आयपीएलचा अंतिम सामना जिंकला.